गुन्हे वृत्त

अनोळखी इसमाच्या खुनाचा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणून 24 तासांच्या आत आरोपींना केले जेरबंद : शिळ – डायघर पोलिसांची कामगिरी

ठाणे : दिनांक 13 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास फडके पाडा येथील पोलीस पाटील परशुराम सिताराम पाटील यांनी शिळ डायघर पोलीस ठाण्यात फोन करुन कळविले की, शिळ दिवा रोडवरील खाडी पुलाच्या डाव्या बाजूस खाडी किनारी चिखलात एक लाल रंगाची लोखंडी पत्र्याची पेटी बेवारस पडली असून पेटीमधून उग्र वास येत आहे. सदर माहिती मिळताच शिळ डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पेटी बाहेर काढून उघडली असता पेटीमध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत हातपाय बांधून गोणीत घालून वरुन बेडशिटने बांधून कोंबून ठेवल्याचे आढळले.

सदरचा प्रकार हा खुनाचा असल्याची खात्री झाल्यावर शिळ डायघर पोलीस स्टेशन, गु.रजि. क्र. 137/2021, भा.दं.वि. कलम 302, 201 प्रमाणे दिनांक 13 मे 2021 रोजी रात्री अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील मयत इसमाची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेणे गुन्ह्याचे तपासात अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आलेली लाल रंगाची लोखंडी पत्र्याची पेटी एवढाच आधार होता. प्रथम अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करुन अशा प्रकारची पेटी कुठून खरेदी केली असावी याबाबत तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवा, मुंब्रा भागातील भांड्यांचे, फर्निचरचे व्यापारी यांच्याकडे तपास केला असता सदर पेटी दिवा व मुंब्रा भागातून खरेदी केली नसल्याचे समजले.

अधिक तपासात अशा प्रकारची पेटी तुर्भे स्टोअर येथे मिळत असल्याची प्राप्त झाली. तुर्भे स्टोअर येथे जाऊन चौकशी केली असता अशा पेट्या धारावी मुंबई येथे तयार होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने डाबर कम्पाऊंड, धारावी, मुंबई येथील कारखान्यात जाऊन विचारपूस केली असता पेटी तेथूनच खरेदी केली असल्याचे समजते. दुकान मालकाकडे विचारपूस केली असता ती पेटी दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी एका महिलेने विकत घेतली असल्याचे कळाले. त्या परिसरात महिलेचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. प्राप्त मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर ती महिला नवी मुंबई परिसरात असून तिने बोरिवली येथे काम शेधण्यासाठी एका इसमास संपर्क केला असल्याचे समजले. त्यावरुन पोलिसांनी बोरीवली येथे जाऊन त्या इसमाकडून त्या महिलेचे आधारकार्ड व फोटो प्राप्त केला.

सदर गुन्ह्याचे तपासात संकलित केलेल्या माहितीचे योग्य संयोजन करुन पोलिसांनी घणसोली, नवी मुंबई येथून संशयित महिला अनिता संजय यादव हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता तिने तिचा सख्खा भाऊ विजय पिसू भल्लारे याच्याशी संगनमत करुन तिचा प्रियकर मनिष यादव याचा खून केला असल्याची कबुली दिली. तिच्याकडे अधिक तपास करुन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या बाजूला नाथानी टॉवरच्या सातव्या मजल्यावरील लेबर कॅम्प येथून विजय भल्लारे यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात गुन्ह्यातील मयत इसमाने आरोपी महिलेस लग्नाचे अमिष दाखवून सुमारे दिड वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले होते व तो लग्नास नकार देत असल्याचे आरोपी महिलेने तिच्या भावाशी संगनमत करुन मयत याचा ते रहात असलेल्या दिवा येथील घरात खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अशा प्रकारे सदर गुन्हा पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला, अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे, परिमंडळ 1, ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, कळवा विभाग, ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, शिळ डायघर पोलीस स्टेशन, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिळ डायघर पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरफरे, पोलीस उपनिरीक्षक तागड, पोलीस हवालदार धनंजय मोहिते, पोलीस हवालदार विजय काटकर, पोलीस नाईक हेमंत भामरे, पोलीस नाईक गोविंद पाटील, पोलीस नाईक राकेश सत्रे, पोलीस नाईक सुशांत पाटील, पोलीस शिपाई कृष्णा बोराडे, पोलीस शिपाई समाधान माळी, पोलीस शिपाई महेंद्र बरफ, पोलीस शिपाई राजेंद्र सोनवणे, महिला पोलीस शिपाई योगिता बाबर, महिला पोलीस शिपाई वंदना बागल यांनी अथक परिश्रम घेऊन सातत्याने तपास करुन 24 तासाच्या आत खुनासारखा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहिते (गुन्हे) हे करीत आहेत. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!