ठाणे

समितीचा ध्रृवतारा निखळला… संघर्ष समितीचे पदाधिकारी बळीराम तरे यांचे दुःखद निधन..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : समाज हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा निश्चयाचा महामेरु,आपल्या अद्वितीय अशा बोधप्रद शब्दमालांनी श्रोत्यांना खिळवून ठेवणारा जबरदस्त वक्ता आणि भारदस्त खणखणीत आवाजाने समोरच्याला पाचावर धारण बसविणारा संघर्ष समितीचा महान खंदा नायकबळीराम तरे यांचे दुःखद निधन झाले.त्याच्या ह्या अशा अकाली जाण्याने  २७ गावातील अखिल समाज पोरका झाला असून संघर्ष समितीची कधीही न भरुन येेणारी कळी निर्माण झाली आहे.     

स्व.बळीराम तरे हे २७ गावे मुक्ति लढ्यातील एक अग्रगण्य संघर्ष सेनानी होते.त्याच बरोबर  आपल्या संपूर्ण आयुष्यात समाज सेवेचे व्रत स्विकारलेले ते खरेखुरे द्रष्टे समाजसेवक होते. आपल्या ह्या समाज चळवळीत आपल्या राजकीय अस्तित्वाची होळी झाली तरी त्याची जराही तमा न बाळगणारे ते एक निडर व्यक्तिमत्व होते. १९८३ साली जेव्हा २७गावे कल्याण महानगरपालिकेत समाविष्ट केली गेली त्याचवेळी हि महापालिका आपल्या २७ गावातील भुमिपुत्रांना नेस्तनाबूत करणारी ठरेल ह्याची सर्व प्रथम समाजाला जाण करून देणार्या द्रष्ट्या समाज बांधवांपैकी ते एक प्रमुख समाज हीतचिंतक नेते होते. त्याचवेळी ह्या महापालिके विरोधात जनजागृती करण्यासाठी समाज  बांधवांकडून बैलगाडी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ह्या मोर्चाला आकार देऊन त्याची धुरा यशस्वी पणे साभाळण्यात बळीराम तरे साहेबांचा सिंहाचा वाटा होता. समाज हितासाठी तरे साहेबांनी घेतलेल्या ह्या आंदोलनाच्या पुढाकाराने मात्र पुढे चांगला परिणाम साधला गेला आणि २७गावातील समस्त भुमिपुत्र समाज जागृत झाला. त्यानंतर ह्या महापालिकेचे  खरे स्वरूप समाजाला जाणवायला लागले.म्हणून पुढे आपल्या मुळावर येणारे हे महापालिकेचे धुड भिरकावण्यासाठी आणि ह्या  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून २७ गावे मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय संघर्ष  समितीची स्थापना केली.   

          पुढील काळात संघर्ष समितीची धुरा अध्यक्ष रतन  म्हात्रे,राजाराम साळवी आणि त्या नंतर समाजाचे भिष्माचार्य स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांनी सांभाळली. आणि २७ गावातील जनतेला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले.मात्र ह्या संपूर्ण लढ्याचे खरे श्रेय हा लढा उभारणार्या संघर्षाचे प्रणेते बळीराम तरे  आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांचेच आहे हे विसरता येणार नाही. ह्या संपूर्ण लढ्यामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या भाषण शैलीने आणि नवतरुणांच्या मनात क्रांतीचा अंगार फुलविणार्या घोषणांनी बळीराम तरे साहेबांनी  समाज मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. ‘बोल किसाना हल्ला बोल’, ‘कोयता लेके हल्ला बोल’फावडा लेके हल्ला बोल’नांगर उठाके हल्ला बोल ! ह्या शेतकर्यांच्या पारंपारिक आयुधांचा ऊल्लेख करून त्यांनी आपल्या पहाडी आवाजात दिलेल्या घोषणांनी आख्खी महापालिका हादरून जात असे! स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर काढलेल्या विळा कोयता मोर्चाच्या वेळी त्यांच्या ह्या  घणाघाती घोषणांचा फार मोठा प्रभाव दिसून आला.   त्यानंतर २७ गावांच्या मुक्ती आंदोलनात बळीराम तरे साहेबांची निस्वार्थी काम करण्याची वृत्ती,समाजाच्या कल्याणासाठी त्यांची असलेली तळमळ आणि संघर्ष करण्याची त्यांची आक्रमक प्रवृत्ती समाजातील नवयुवकांना कायम प्रेरणादायी ठरत राहिली आहे.आज शासनाने २७ गावांपैकी१८ गावे वगळून ह्या गावांची स्वतंत्र नगरपारिषद  निर्माण केली आहे. तो लढा अजून संपलेला नाही. समितीने दुसर्यांदा सुरू केलेल्या संघर्ष समितीच्या ह्या आंदोलनात सुद्धा बळीराम तरे साहेब नेहमीच अग्रस्थानी राहिले. दुर्दैवी मृत्यूने त्यांना  दूर केले असले तरी त्यांच्या कर्तृत्वाने, वक्तृत्वाने ,नेतृत्वाने आणि श्रेष्ठत्वानेही ते कायमच आमच्या स्मरणात राहतील, असा नेता पुन्हा होणे नाही अश्या शब्दात संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!