ठाणे

कल्याणमधील दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिका आणि राजणोली उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

कल्याण- कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे  कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूककोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत दुपारी ई लोकार्पण झाल्यानंतर श्री. शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह या दोन्ही पुलांचे लोकार्पण प्रत्यक्ष जागेवर येऊन केले.

कल्याण शहराला जोडणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर बांधण्यात आलेल्या चार मार्गिकांच्या पुलापैकी पहिल्या दोन मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. पत्रिपुलाचे काम आणि गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर दुर्गाडी पुलापाशी वाहतूक वाढल्याने वाहतूककोंडी होऊ लागली होती. या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच दोन्ही मार्गिका सुरू होत्या. अशात या नवीन पुलाच्या दोन मार्गिका सुरू झाल्याने शहराला वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन पुलामुळे जुन्या पुलावरून येणे आणि नव्या पुलावरून जाणे शक्य होणार असल्याचं मत श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

तर मुंबई-आग्रा महामार्गावरून  नाशिकवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजणोली उड्डाणपुलावरील दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यामुळे भिवंडी जंक्शनपाशी होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. त्याचा फायदा या महामार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या छोट्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात होणार आहे.    

आज पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री श्री. शिंदे यांच्यासह कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण ग्रामीणचे खासदार कपिल पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
माजी आमदार नरेंद्र पवार हे उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!