ठाणे

कपिल पाटील यांच्या मदतीनंतर हाली बरफ यांना मिळाली नोकरी

 उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांचा स्तूत्य पुढाकार

डोंबिवली ( शंकर जाधव )   : काही वर्षांपूर्वी यशस्वी झूंज देऊन चक्क बिबट्याला पळवून लावणाऱ्या धाडसी हाली बरफ यांना गरीबीमुळे लाकडांची मोळी बांधावी लागत होती.या परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन खासदार कपिल पाटील यांनी २१ हजार रुपयांची मदत केली होती. यानंतर हाली बरफ यांच्या आर्थिक स्थितीची उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनीही दखल घेत शहापूरच्या तहसील कार्यालयात हाली यांना तात्पुरती तीन महिन्यांची नोकरी दिली.

   हाली यांनी केलेल्या शौर्याची नोंद राष्ट्रपतींनीही घेऊन पुरस्कार प्रदान केला होता. या पुरस्काराबद्दल वीरबाला हाली हिचे कौतूक झाले. पण तिचा दररोजच्या जगण्याशी संघर्ष सुरूच राहिला. तिचा दररोजचा दिवस भाकरीचा चंद्र शोधण्यात जात होता. अल्प वयातच विवाह झाला. घरची आर्थिक स्थितीही बेताची आहे. तीन मुले झाल्यानंतर खाण्याची भ्रांत होती. अशा परिस्थितीत एका आश्रमशाळेची झाडलोट करण्याचे काम मिळाले. कोरोना आपत्तीत ते कामही गेल्याने मुलांसह उपाशी राहण्याची वेळ आली. हालीची व्यथा समजताच खासदार कपिल पाटील यांनी कपिल पाटील फौंडेशनच्या वतीने २१ हजार रुपयांची मदत केली. तर खासदार पाटील यांचेच स्वीय सहायक राम माळी यांनी महिनाभराचे किराणा सामान दिले होते. या मदतीनंतरही हाली यांना भविष्याची चिंता भेडसावत होती.  या बाबत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनाही प्रसारमाध्यमातून माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ दखल घेतली. हाली यांचे शिक्षण पुरेसे नाही. त्यामुळे त्यांना शहापुर तहसीलमध्ये शिपाई पदासाठी तीन महिन्यांची तात्पुरती नोकरी देण्याचा आदेश काढण्यात आला.

तूर्त हाली यांच्या कुटुंबियांचे जगणे काही अंशी सुकर झाले आहे. हाली यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक इरनक, स्वीय सहायक राम माळी, श्रमजीवी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी अभिनंदन केले. तसेच खासदार कपिल पाटील यांनी या निर्णयाबद्दल डॉ. मोहन नळदकर यांचे आभार मानले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!