महाराष्ट्र

खोडाळा बाजारपेठेत भुरट्या चो-यांना उधाण

भुरट्या चोरांचे थैमान 

लॉकडाऊनचा परिणाम 

अपुरे पोलीस बळ

गस्तीची आवश्यकता 

दीपक गायकवाड – मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे. याठिकाणी मागील आठवड्यापासून चो-यांचे प्रमाण वाढले आहे. एकाच आठवड्यात अंतरा – अंतराने भुरट्या चोऱ्या होत असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.याबाबत वारंवार संपर्क साधूनही तपासात दिरंगाई होत असल्याने येथे तातडीने अधिक पोलीस बळ व रात्र गस्तीची मागणी खोडाळा ग्रामपंचायतीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

आधीच लॉकडाऊन मुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यातच हाताला काम नसल्याने भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय व्यापा-यांचे दुहेरी नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जरुर त्या उपाययोजना करण्याची मागणी या धर्तीवर केली जात आहे.  

आत्तापर्यंत खोडाळा बाजारपेठेत 4 दुकानात चोरी झाली असून चोरट्यांनी शिताफीने कुलूप तोडून काही रोकड व सामाणांची चोरी केल्याची घटना घडली आहे.तसेच कडव गॅस एजंसी मधूनही भरलेले 24 सिलिंडर चोरीला गेले आहेत.  त्याशिवाय ऐन शेती हंगामाच्या तोंडावरच बैल जोड्या, गाय वासरे चोरुन नेली आहेत. मागील 2 महिन्यात खोडाळा येथील शेतकरी पुंडलीक हमरे यांचा बैल, सुरेश शिंदे यांची गाय – वासरु, प्रकाश बोढारे यांचा बैल व गाय, पांडूरंग झिंजूर्डे यांची गाय – वासर, पांडू गावित यांची बैलजोडी, यमुना खुताडे यांंची गाय – वासरु आणि कान्हा पाटील यांची गाय चोरीला गेलेली आहे. तसेच नाशेरा येथूनही बैल जोडी चोरीला गेलेली आहे. बांधलेली जनावरे दावे तोडून पळवली जात आहेत. या चोरट्यांचा मागमूस अजून लागलेला नसताना आत्ता पुन्हा खोडाळा बाजारपेठेत भुरट्या चोरांनी थैमान घातल्याने येथील व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. 

अपुरे पोलीस बळ •   

                  खोडाळा ही महत्वाची आणि गजबजलेली बाजारपेठ आहे. याठिकाणी पोलीस दुरक्षेत्र आहे.असंख्य महसुली गावे आणि दुप्पट वाड्या वस्त्या असल्याने या दुरक्षेत्राचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे. मात्र इतक्या मोठ्या कार्यक्षेत्राच्या मानाने पोलीस दल हे अत्यल्प आहे. त्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व इतरही न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजासाठी पोलीसांचे नियोजन झाल्यानंतर दुरक्षेत्रात शुकशुकाट असतो. ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. 

संधी साधून होतात चो-या •       

                        विस्तीर्ण कार्यक्षेत्र , नैमित्तिक व आगंतुक कामे आणि अपुरे मनुष्यबळ यामूळे पोलीस दुरक्षेत्राला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच अपु-या गणसंख्येमुळे पोलीस स्टेशनला शुकशुकाट दिसला की हमखास त्याच दिवशी सलगपणे 2-2  दुकानात चो-यांच्या घटना घडलेल्या आहेत. 

रात्र गस्तीची मागणी •   

                     खोडाळ्यात होणा-या वाढत्या चो-या लक्षात घेऊन येथे कायम स्वरूपी रात्र गस्त घालण्याची तसेच येथे कायम स्वरूपी पुरेसे पोलीस दल उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी बांधवांसह दस्तूरखुद्द खोडाळा ग्रामपंचायतीने केली आहे.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!