महाराष्ट्र

गणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे, दि. 9 : गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात जनजागृती करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, लोकांना संघटित करण्यासाठी केली. आपला कोरोनाच्या संकटाशी सामना सुरूच आहे.  शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पुणे परिवार या संस्थेच्या वतीने आयोजित लोकमान्य जीवन गौरव, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता, गणेश सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त राजेंद्र डहाळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, मंडई गणेशोत्सव मंडळाचे आण्णासाहेब थोरात, कार्यक्रमाचे संयोजक प्रताप परदेशी उपस्थित होते.

गृहमंत्री श्री. वळसे-पाटील पुढे म्हणाले, पुणे परिवारातर्फे गेल्या 16 वर्षांपासून  देण्यात येणारा  पुरस्कार हा स्तुत्य उपक्रम आहे. गणेशोत्सव व अन्य क्षेत्रात चांगले काम करणा-या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात.  सध्या कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव मोठया प्रमाणात करता येत नाही. कोणत्याही समाजाचे सण असो, सणाच्या नावावर गर्दी केल्याने तोटा होतो. कोरोना गेला आहे, या विचारात राहून चालणार नाही. मास्क लावा, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा, हे नियम पाळले पाहिजेत.

दुस-या लाटेमध्ये बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते, माणूस दगावला तर नातेवाईक जवळ येऊ शकत नव्हते. ही परिस्थिती थोडीशी काळजी घेऊन टाळता येऊ शकते, असे सांगून ते पुढे म्हणाले, लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जरी कोरोना झाला तरी त्याची तीव्रता कमी होते.

गणेश मंडळांनी मोठे देखावे करण्याऐवजी लसीकरणाच्या कामाला प्राधान्य देऊन जनजागृती करावी. रत्स्त्यावरील अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही श्री. वळसे पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी डॉ. अविनाश भोंडवे, कॉन्स्टेबल सतीश गाडे, सुरेश पोटफोडे, नंदू घाटे, किरण सोहनीवाल, अनिरुध्द येवले, अमित जाधव, प्रशांत मते, स्वप्नील दळवी, विवेक खटावकर, प्रमोद राऊत यांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!