ठाणे : – कळवा, खारेगाव येथील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रस्तावित केलेल्या विटावा ते ठाणे खाडीपुलाला निधी देण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. आयुक्त आर. ए. राजीव यांच्याशी शुक्रवारी झालेल्या बैठकीत या पुलाचा ५० टक्के खर्च उचलण्यास श्री. राजीव यांनी होकार दिला. उर्वरित ५० टक्के निधी ठाणे महापालिका खर्च करणार आहे.
ठाण्याशी संबंधित विविध प्रकल्पांसंदर्भात खा. डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीए मुख्यालयात आयुक्त आर. ए. राजीव यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, शहर अभियंते अनिल पाटील, कार्यकारी अभियंते श्री. पाफळकर आदी उपस्थित होते.
बैठकीत हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी विटावा-ठाणे रेल्वेला समांतर खाडीपूल, मुंब्रा अग्निशमन केंद्र ते काटई नाका डीपी रोड, कल्याण फाटा-शीळ फाटा-वाय जंक्शन येथील उड्डाणपूल आदी प्रकल्पांची चर्चा झाली. नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कळव्याला अनावश्यक वळसा घालावा लागतो. यामुळे कळवा, खारेगाव, कळवा पुल येथे वाहतूक कोंडी होते. यावर उतारा म्हणून विटावा ते ठाणे स्थानक असा हलक्या वाहनांसाठी रेल्वेला समांतर खाडीपूल बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीएकडे केली होती. शुक्रवारच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली असता श्री. राजीव यांनी प्रकल्पाचा ५० टक्के निधी देण्यास होकार दिला.
मुंब्रा बायपास येथील वाय जंक्शन, शीळ फाटा आणि कल्याण फाटा येथील उड्डाणपुलांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. त्यावर, वाय जंक्शन येथील कामाला सुरुवात झाली आहे, परंतु बुलेट ट्रेनमुळे शीळ फाटा आणि कल्याण फाटा येथील उड्डाणपुलांचे आरेखन बदलावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. बुलेट ट्रेनच्या मार्गावरून उड्डाणपूल नेणे अव्यवहार्य असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी अंडरपासच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असल्याचे श्री. राजीव यांनी सांगितले. त्यावर या अंडरपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून एमएमआरडीएला पाठवण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी ठामपाचे शहर अभियंते अनिल पाटील यांना केली.
मुंब्रा अग्निशमन केंद्र-दिवा-काटई नाका हा रस्ता होणेही आवश्यक असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी मांडली. यापैकी काही भाग डीपी मध्ये असून सद्यस्थितीत कच्चा रस्ता आहे. एमएमआरडीएने या रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल पाठवण्यास श्री. राजीव यांनी ठामपला सांगितले. हा रस्ता झाल्यास शीळ-कल्याण रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, तसेच दिवावासीयांना लांबचा वळसा घालावा लागणार नाही.
विटावा-ठाणे खाडीपुलासाठी एमएमआरडीए निधी देणार खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
