दिवा : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिना निमित्ताने कल्याण येथील खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंउडेशन आणि शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा ( पूर्व ) येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला दिव्यातील नागरिक आणि शाळकरी मुलांनी तोबा गर्दी केली होती.
दिवा पूर्व येथे शनिवारी शिवसेनेतर्फे एक दिवसीय विनामूल्य आरोग्य तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शालेय विद्यार्थ्यांसह सुमारे दोन हजारावर दिवेकर नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व प्रकारच्या आजारावर रुग्णांची तपासणी व निदान करण्यात आले. निदान झालेल्या रुग्णांना त्वरित मोफत औषधे देण्यात आली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत किवा धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दरात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबीरात सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग,त्वचारोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग,मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग,मधुमेह, श्वसनाचे विकार, कान, नाक, घसा,प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग,लठ्ठपणा, हार्निया ,
अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार,
बालहृदयविकार अशा विविध आजारांची तपासणी विनामूल्य करण्यात आली. शिबिराचे आयोजन खा.डॉ.श्रीकांत शिंदे व ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले असून दिव्यातील सर्व नगरसेवकांनी व शिवसैनकांनी शिबिराचे नियोजन केले. तर शिबीर यशस्वी करण्यासाठी मुंबई-ठाणे येथील विविध नामांकित हॉस्पिटल्स व ठाणे शहरातील सर्व डॉक्टर्स संघटना यांनी मोलाची साथ दिली.यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे , उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेविका दर्शना चरण म्हात्रे, नगरसेवक अमर पाटील उपस्थित होते.