
ठाणे दि १ सप्टेंबर : प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात प्रथम क्रमांक आल्या बद्दल राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिडको भवन सभागृह सी.बी. डी. बेलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्राम विकास सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्ष ( ग्रामीण) गृह निर्माण संस्था संचालक धनंजय माने उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारची महत्वाकांक्षी असणारी प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) दर्जेदार कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याच बरोबर केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये सर्वोतम कामगिरी केल्या बद्दल कल्याण आणि भिवंडी तालुक्याचा गौरव करण्यात आला. तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये उत्तम कामगिरी केल्या बद्दल शहापूर आणि अंबरनाथ तालुक्याला गौरवण्यात आले. या प्रसंगी भिवंडी तालुक्याचे गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के, कल्याण तालुक्याचे गट विकास अधिकारी श्वेता पालवे, अंबरनाथ तालुक्याचे गट विकास अधिकारी शीतल कदम आणि शहापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी टी. ओ. चव्हाण यांनी तालुक्यांचा पुरस्कार स्वीकारला.
ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी , गट विकास अधिकारी, ग्रामीण गृह निर्माण अभियंता, पंचायत समिती घरकुल योजना कर्मचारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या सर्व घटकांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीचे फळ म्हणजे आजचा गौरव आहे. असा शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. शिवाय सन २०१७-१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगितले.