मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून ३७ लाख७६ हजार रुपयांच्या कोकेन बाळगणाऱ्या नायजेरियनला बेड्या ठोकल्या. सदर कारवाई ४ सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे १२.५५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मुंबईत वाढत्या अंमलीपदार्थांच्या तस्करींना आळा घालण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार आंबोली पोलीस ठाण्याचे पथकदेखील अंमलीपदार्थ तस्कऱ्यांवर लक्ष ठेवून असताना सपोनि दया नायक यांना खबऱ्याने माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने जोगेश्वरी पश्चिम परिसरातील सहकार रोड येथे सापळला लावून फेमी ओल्युयंका ओपयेमी ख्रि (२९) या नायजेरियन नागरिकाच्या मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४७२ ग्रॅम कोकेन आढळून आले. या कोकेनची किंमत ३७ लाख ७६ हजार रुपये आहे.
ही उत्तम कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सरगर, सपोनि दया नायक, सपोउनि सावंत, अंमलदार नादीर, बोमटे, चव्हाण, पवार, पाटील, राणे आदी पथकाने केली.