नवी मुंबई : कर्तव्य बजावताना पोलीस नाईक (बक्कल नं. 12008) अतुल घागरे शहीद झाले. ते 30 वर्षांचे होते. ही दुर्दैवी घटना 5 सप्टेंबर 2018 रोजी पहाटे 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास नितळस फाटा, पनवेल येथे घडली. घागरे यांच्या पत्नी सृष्टी यादेखील नवी मुंबई पोलीस दलातील अतिक्रमणविरोधी पथकात कर्तव्यावर आहेत.
या अपघाताप्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहीद पोलीस नाईक अतुल घागरे यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी आळेफाटा, वडगाव आनंदी (पाजिरवाडा) येथे नेण्यात आले असून रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तळोजा एमआयडीसी परिसरात नेहमी अवजड वाहनांची वर्दळ असते. या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तळोजा वाहतूक चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक अतुल घागरे 4 सप्टेंबर 2018 रोजी रात्रपाळीला कर्तव्य बजावत होते. वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना अज्ञात अवजड वाहनाखाली चिरडल्याने पोलीस नाईक अतुल घागरे चिरडले गेले.
दरम्यान, पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास एका सुजान रिक्षा चालकाने अपघातात पोलीस जखमी असल्याची माहिती दिल्यानंतर तळोजा पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्ही दाखल करण्यात आला असून, पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
एक चांगला सहकारी अचानक आपल्यातून निघून गेला यावर विश्वास बसत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया शहीद पोलीस नाईक अतुल घागरे यांच्या सहकार्यांनी व्यक्त केली.
कर्तव्य बजावताना पोलीस नाईक अतुल घागरे शहीद ; अज्ञात वाहन चालकाने चिरडले
