ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराच्या पूर्वेकडील कोपरी विभागातील धोबीघाट परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अन्यायी कारभाराविरोधात ‘जनहित फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कुवळेकर यांनी बुधवार, दि. ५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शहर विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली कोपरीतील धोबीघाट परिसरातील झोपड्या निष्कासित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी विकासकाकडून प्रत्येक झोपडीधारकास परिपत्रक क्र. १५३अन्वये पर्यायी जागेसाठी घरभाडे देण्याची तरतूद असतानाही, गेल्या तीन महिन्यांपासून एकाही झोपडीधारकास अद्यापपर्यंत घरभाडे देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ कुवळेकर यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, झोपु प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी जयराम पवार, झोपु प्राधिकरणाच्या तहसीलदार प्रशांती माने आणि झोपु प्राधिकरणाचे सहाय्यक निबंधक अजितकुमार सासवडे या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक वर्तणुकीचा मनस्ताप झोपडीधारकांना बसला असून, त्यांच्यामुळेच आज गोरगरीब स्थानिक रहिवाशांना आपल्या हक्काच्या घरभाड्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप मिलिंद कुवळेकर यांनी केला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या परिपत्रक क्र. १५३अन्वये थकीत घरभाडे त्वरित अदा करावे, समन्वय व मित्रधाम संस्थेला सुधारित विकास नियमावलीनुसार ५ टक्के अतिरिक्त अनिवासी क्षेत्र मंजूर करावे, झोपडपट्टीधारकांचे वैयक्तिक करारनामे एसआरए नियमांप्रमाणे करावेत, तसेच एसआरए नियमांप्रमाणे घरभाडे द्या, अन्यथा वीज आणि पाण्यासहित पुन्हा घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागण्या मिलिंद कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केल्या आहेत.
या बेमुदत उपोषणाला ‘धर्मराज्य पक्षा’ने जाहीर पाठिंबा दिला असून, झोपु प्राधिकरणाच्या परिपत्रक क्र. १५३अन्वये पर्यायी जागेपोटी घरभाडे अदा करण्यासाठी सदरहू परिपत्रकाची त्वरित अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी केली आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष, ठाणे मतदाता जागरण मंच, भारतीय पर्यावरण चळवळ, कोकण रिफायनरीविरोधी संघटना, तसेच इतर समविचारी संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील मिलिंद कुवळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला आहे.