पालघर दि. 6 – जव्हारचे गतवैभव परत मिळवून देऊ असे सांगताना एक उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी सुविधा विकसित केल्या जातील आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. जव्हारच्या पाणीपुरवठ्यासाठी 17.36 कोटी,पर्यटनवृद्धीसाठी 10 कोटी आणि शहरातील विकास कामांसाठी 10कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.
जव्हार नगर परिषद स्थापन होऊन 1 सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित पर्यटन महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजे महेंद्रसिंह मुकणे,खासदार राजेंद्र गावित, कपिल पाटील, आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, रवींद्र फाटक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग आदींची उपस्थिती होती
जव्हार संस्थानचे श्रीमंत राजे मार्तण्डराव मुकणे यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत 1 सप्टेंबर 1918 रोजी जव्हार नगर परिषदेची स्थापना केली होती, त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की,मुकणे राजघराण्याच्या नगर नियोजनाचा दृष्टिकोन होता पण गेल्या 50 ते 60 वर्षांत या भागातील दीन दलित, आदिवासींपर्यंत विकास पोहचलाच नाही. पश्चिम घाटातील हा सर्वांगसुंदर भाग निसर्ग सौंदर्यासाठी नव्हे तर कुपोषणासाठी ओळखला जाऊ लागला.
जव्हार शहराची हद्दवाढ करण्याच्या प्रस्तावास निश्चितपणे मान्यता दिली जाईल असे सांगून खडखड धरणासह या भागातील पाण्याचे सर्व प्रश्न सोडविले जातील असेही मुख्यमंत्री म्हणाले. कुपोषणमुक्ती तसेच स्वच्छ भारत मध्ये पालघर चांगल्या पद्धतीने काम करीत असून जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करताना त्यांनी पालघर जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत उत्तम काम करून एकही कुटुंब बेघर राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले
जव्हार हा पर्यटनाच्या क गटात असला तरी तो ब गटात आणण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी श्रीमंत राजे महेंद्रसिंह मुकणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल. जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी त्यांच्या भाषणात विविध विकास कामांचा उल्लेख केला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पालघरमधील 850 पथदिव्यांचे तसेचपालघर आदिवासी आणि पर्यटन विषयक संकेतस्थळाचेही उदघाटन करण्यात आले.
कुपोषण मुक्ती साठी सप्टेंबर मध्ये पोषण माह राबविण्यात येत आहे, त्या मोहिमेच्या भित्तीपत्रिकेचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले