शहापूर – शेणवा – किन्हवली या मुख्य मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. उंभ्रई बस स्टॉप पासून जवळच तसेच बेडीसगाव आणि मळेगाव या परिसरातील रस्ताच्या कडेला असलेले काही विद्युत वाहक पोळ मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडण्याच्या मार्गावर आहेत ( पूर्णपणे जमिनीच्या दिशेने झुकलेले आहेत ). त्या पोळ वर असलेल्या विद्युत वाहक तारांमधून जाणारा विद्युत पुरवठा खंडित असला तरी सुद्धा जमिनीच्या दिशेने झुकलेले विद्युत वाहक पोळ दुर्देवाने पडले तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर वस्तुस्थिती शेणवा महावितरणचे कार्यकारी उपअभियंता श्री. प्रफुल्ल खैतापूरकर साहेबांना ७ दिवसांपूर्वी निवेदन न देता ऑट्सअपच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार बांधवांनी सुद्धा याबाबतच्या बातम्या आपल्या वृत्तपत्रात व टिव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करून महावितरण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
परंतु सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा व नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून मंगळवार दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठानचे शहापूर तालुका सचिव कु.गणेश धोंडू चौधरी यांच्या वतीने शेणवा व शहापूर महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देतांना सोबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथजी धिर्डे साहेब, सामाजिक कार्यकर्ते दिपक लकडे साहेब, प्रसिद्धी प्रमुख रवींद्रजी खाडे, धसई विभाग संपर्क प्रमुख संकेत भेरे, समाजसेवक सलिम भाई शेख इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.