नवी दिल्ली, 6 : मुंबईच्या आर.एन.पोतदार हायस्कुलच्या शिक्षिका पुजा भसीन आणि रूपिंदर कौर साहनी यांना उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते सीबीएससी शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
येथील वसंतकुंज इंस्टिटयूशनल परिसरातील ‘शौर्य’ सीआरपीएफ ऑफीसर्स इंस्टिटयूट येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘सीबीएससी शिक्षक पुरस्कार २०१७-१८’ च्या वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. कुशवाह यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील 37 शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिव रिना राय यावेळी उपस्थित होत्या.
मुंबईच्या सांताक्रुज भागातील आर.एन.पोतदार हायस्कुलच्या शिक्षिका पुजा भसीन आणि रूपिंदर कौर साहनी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 50 हजार रूपये, प्रशस्तीपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुजा भसीन यांनी परंपरागत पध्दतीसोबतच आधुनिक पध्दतीचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांना गणीत हा विषय सोपा करून शिकवतात. ट्विटर, फेसबुक, फ्लिप्ड लर्निंग नेटवर्क आदिंचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा विस्तारीत करण्याचे कार्य त्या करीत आहेत. त्यांनी फ्लिफ्ड वर्ग घेत विद्यार्थ्यांमधील वैविद्यपूर्ण गुणांना हेरून शिक्षण देण्याची पध्दती विकसित केली आहे. विद्यार्थ्यांमधे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तेला उजाळा देण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेऊन त्यांचा आज सन्मान करण्यात आला.
रूपिंदर कौर साहनी या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची आवश्यकता व आवडीनुसार गुगल वर्ग, एडपजल, काहूट, क्विजलाइज, गो कॉनरैंड फ्लिप्ड व्हिडीयो आदी आधुनिक माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थी स्नेही शिक्षण देण्याचे कार्य त्या करीत आहेत. विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण, कथा वाचन आदीं उपक्रमांसाठी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात श्रीमती साहनी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.