लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूर शहराचे अधीक्षक सुरेंद्र कुमार दास यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रिजन्सी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सुरेंद्र कुमार दास यांच्या शरीरात विषाचे अंश असल्याचा दुजोरा डॉक्टरांनी दिला आहे. पोलिस अधीक्षक सुरेंद्र दास यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
पुढील काही तास महत्त्वाचे आहे. आज दुपारी 4 वाजता पुन्हा मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल, असं रिजन्सी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक राजेश अग्रवाल यांनी सांगितलं. सुरेंद्र कुमार यांच्याकडून सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. कौटुंबिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतं. परंतु या संबंधात ठोस माहिती मिळालेली नाही.
शिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी सुरेंद्र कुमार दास हे बलियामधील रहिवासी आहेत.सुरेंद्र दास कानपूरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते होते. मागील महिन्यातच त्यांची कानपूरमध्ये बदली झाली होती. इथे ते पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
तर त्यांची पत्नी डॉक्टर असून त्या कानपूर वैद्यकीय कॉलेजमध्ये काम करतात. मात्र या घटनेनंतर पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे.
IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटही सापडली
