गुन्हे वृत्त

अंधेरीतील बोगस कॉलसेंटरवर धाड दीड हजार अमेरिकन नागरिकांना दीड कोटी रुपयांचा गंडा

मुंबई : मुंबईतील अंधेरीत बोगस कॉल सेंटर उभारून दीड हजार अमेरिकन नागरिकांना तब्बल दीड कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या कॉलसेंटर मालकासह २ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद धराडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ६ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री करण्यात आली. १५ तासांहून अधिक तासांच्या चौकशीअंती कॉलसेंटरच्या माध्यमातून सुरू असलेला फसवणुकीचा धंदा उजेडात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी ४८ हार्डडिस्क जप्त केल्या असून, या फसवणुकीच्या धंद्यात सहभागी असलेल्या आणखी ४ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
अंधेरी सबवे समोरील ५८ वेस्ट इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एक्सफिनिटी कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष – ९ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक
शरद धराडे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या माार्गदर्शनाखाली ६ सप्टेंबर रोजी रात्री कॉल सेंटरवर पोलीस पथकाने धाड टाकली. त्यावेळी ३९ जण कॉम्प्यूटरवर काम करत होते.
पोलिसांनी संगणक तज्ज्ञ कुलदीप इंदरकर, पुष्कर झांट्ये यांच्या मदतीने कॉम्प्यूटरमधील डाटा तपासला असता अमेरिकन नागरिकांची संपूर्ण माहिती, व्हीआयपी कॉल, ई-मेल आढळून आले. या माहितीच्या आधारे कॉल सेंटरमधून अमेरिकन ॲक्सेंटनुसार संवाद साधून कॉम्प्यूटरमधील व्हायरस, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॉम्प्यूटरची दुरुस्ती, मालवेअर क्लिन करून देण्याच्या मोबदल्यात पैसे घेण्याचे येत होते. त्या मोबदल्यात गिफ्ट कार्डच्या माध्यमातून अमेरिकन डॉलर स्वीकारले जात होते. सदर डॉलर भारतीय वेन्डरकडून भारतीय चलनात रूपांतरी केली जायची. मात्र पैसे घेतल्यानंतर अमेरिकन नागरिकांची कॉम्प्यूटरच्या संदर्भात असलेली दुरुस्ती केली जात नव्हती.
या फसवणुकीच्या फंड्यानुसार गेल्या ७ महिन्यांत कॉल सेंटरच्या माध्यमातून दीड हजार अमेरिकन नागरिकांची दीड कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या फसवणूक प्रकरणी भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४७१, ६५ (अ)(ब)(क), ६७ सह टेलिग्राम ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून एक्सफिनिटी कॉल सेंटरचा मालक डेव्हीड अल्फान्सो (२२) व संदीप यादव (२२) यांना अटक केली. या फसवणूक प्रकरणात आणखी ४ ते ५ जणांचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्या दृष्टीकोनातून गुन्हे शाखा कक्ष ९ चे पथक तपास करत आहेत.
गुन्हे प्रकटीकरण उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पाोलीस आयुक्त (डी-पश्चिम) अभय शास्त्री, गुुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आशा कोरके, सपोनि इरफान शेख, सपोनि शरद धराडे, पोउनि वाल्मिक कोरे, पोउनि विजयेंद्र आंबवडे, हवालदार शिर्के, शिंदे, गावकर, पोना सावंत, पाटील, शेख, वारंगे, पेडणेकर, नाईक, हाके, राऊत, पोशि महांगडे, पवार, निकम आदी पोलीस पथकाने संगणक तज्ज्ञ कुलदीप इंदरकर, पुष्कर झांट्ये यांच्या मदतीने या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!