अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंधन आणि कर वाढीच्या निषेधार्थ येत्या सोमवार १० सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेसने “भारत बंद”चे आवाहन केले आहे. या बंदमध्ये सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, वाहनचालकांनी, रिक्षाचालक मालक संघटनांनी सहभागी होऊन या सत्ताधाऱ्यांचा शांततेच्या मार्गाने निषेध करू या. असे आवाहन अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व गटनेते प्रदीप पाटील यांनी केले आहे.
ब्लॉक काँग्रेसच्या इंदिरा भवन या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी वरील आवाहन केले. नगरसेवक पंकज पाटील, उपाध्यक्ष रोहित प्रजापती, व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजीभाई धल, हितेश कोठारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अच्छे दिन चे पोकळ आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापरी, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी अशा सर्वांचेच जगणे मुश्किल केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या सर्वांचा निषेध करण्यासाठी येत्या सोमवार १० सप्टेंबर रोजी “भारत बंद”चे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये अंबरनाथकरांसह सर्वानी स्वतःहून सहभागी व्हावे. आम्ही हा बंद शांततेच्या मार्गाने करणार आहोत. कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होईल असे कार्य करणार नाही. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बंद पाळण्यात येणार असल्याचेही प्रदीप पाटील यांनी सांगितले. व्यापारी या बंद मध्ये सहभागी होतील असे व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजीभाई धल यांनी सांगितले.