मुंबई : गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून बांगलदेशातून अल्पवयीन मुलींना आणून भारतात विकणाऱ्या मोस्ट वॉन्टेंड आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. या मुलींना फसवून आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असे. आरोपी मोहम्मद सैदुल शेख हा बांगलादेशचा नागरिक असून तो हवाला मार्गाने आपल्या देशात पैसे पाठवत होता. बांगलादेशातील अल्पवयीन मुलींना भारतात आणून त्यांची रवानगी कुंटणखान्यात करून त्याचे पैसे हवाल्याने बांगलादेशात पाठवणारी टोळी अस्तित्वात होती. शेख हा त्या टोळीचा म्होरक्या होता. वसईच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केलीय.
त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्याने मागील वर्षभरात किमान पाचशे मुलींची तस्करी केल्याचं त्यानं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील इतर सहा आरोपीनाही पोलिसांनी अटक केलीय. गेल्या वर्षी पोलिासांनी एका कुटंणखान्यावर छापा टाकून चार मुलींची सुटका केली होती.
या चारही मुली बांगलादेशी होत्या आणि त्यांना फसवून या व्यवसायात आणण्यात आले होते. तेव्हापासून मुलींना फसवून आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होते शेख हा पोलिसांना तावडीत सापडत नव्हता.
सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे.
त्यानंतर ते एजटं सैदुलकडे आणायचे. तो त्यांना भारत बांगलादेशच्या सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात आणायचा आणि देशाच्या विविध भागात विकायचा. अल्पवयीन मुलगी असेल तर किमान १ लाख रुपये आणि इतर तरुणींना ५० ते ६० असा सौदा होत असे. यानंतरही त्याला कुंटणखान्यातून दरमहिन्याला या मुलींच्या मोबदल्यात महिना ५ हजार रुपये रक्कम मिळत असे.