कल्याण : वेगवेगळ्या क्षेत्रात राहून समाजसेवा करणाऱ्या कल्याणातील विविध मान्यवर व्यक्तींचा ‘अटलसेवा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोईर आणि अनुलोम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आज समाजात अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या आपल्या कार्यातून समाजसेवेचा वसा पुढे नेत आहेत. अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘अटल सेवा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी सांगितले. यामध्ये पिसावली परिसरातील उच्चशिक्षित डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर, सैनीक आणि वेगवेगळ्या निमित्ताने समाजसेवा करणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. या व्यक्तींच्या हातून अजून चांगली समाजसेवा घडण्यासाठी हा पुरस्कार त्यांना नेहमी प्रोत्साहन देईल असेही भोईर म्हणाले.

दरम्यान अटलसेवा पुरस्कारासोबतच अनुलोम संस्था आणि भारतीय पोस्ट खात्याच्या साहाय्याने पोस्ट योजना शिबीराचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे 500 नागरिकांचे पोस्ट खाते आणि लहान मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मोफत खाते सुरू करण्यात आले.