मोहोळ :अवैध दारु विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला मोहोळ पोलिसांच्या डी. बी पथकाने रंगेहात पकडले. विठ्ठल नागनाथ मते (रा.चिखली ता. मोहोळ) असे संशयीत आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून ४३ हजार ९६९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर-पुणे महामार्गावर यावली गावच्या शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी ०९ सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिस ठाण्याचे डी. बी पथक यावली परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दुपारी १ वाजता पथक सोलापूर-पुणे महामार्गावर अनगर फाटा येथे त्यांना एक दुचाकीस्वार संशयीतरित्या थांबल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव विठ्ठल नागनाथ मते (रा.चिखली ता. मोहोळ) असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या दुचाकीला (क्र. एम.एच.१३. सी.एन. ३९१०) आडकावलेल्या पिशवीत अवैध दारुचा साठा मिळून आला. पोलिसांनी ४३ हजार ९६९ रुपयांचा मुद्देमालासह मते याला ताब्यात घेऊन गजाआड केले.
मोहोळ पोलिस ठाण्याच्या डी. बी पथकातील हेड. कॉ. बागवान, पोलिस नाईक ढावरे, पो. कॉ. गणेश दळवी आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात विठ्ठल नागनाथ मते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक हंचे करीत आहेत.