मुंबई, दि. 10 : एशियन गेम्स 2018 स्पर्धेत भारताला नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या राही सरनोबत हिला पुढील वाटचालीसाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
राही सरनोबत हिने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये नेमबाजीतील 25 मीटर एअर पिस्तुल या प्रकारात सुवर्णवेध घेतला होता. एशियन गेम्स 2018 स्पर्धेनंतर राही सरनोबत हिने क्रीडामंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राही सरनोबत यांचे नातेवाईक उपस्थित होते.
या भेटीदरम्यान श्री.तावडे यांनी राही सरनोबत हिचा सत्कार करीत तिला यापुढील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही राही सरनोबत हिने भारतासाठी खेळताना अशीच सुवर्ण कामगिरी करून समस्त महाराष्ट्रवासियांच्या पदकाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे सांगून येणाऱ्या काळात स्पर्धेसाठी तयारी करीत असताना महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.