मुंबई : रेल्वे प्रवासात संकट समयीप्रवाशांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या 1512 या हेल्पलाईनने 11 सप्टेंबर 2018 रोजी पुन्हा एकदा कमाल केली. रेल्वे प्रवासात लाखो रुपयांचे (6 ते 7 तोळे) दागिने रेल्वेत विसरलेल्या प्रवासी महिलेला वडाळा लोहमार्ग पोलिसांमुळे परत मिळाले.
श्रीमती आशा शिंदे यांनी चेंबूर येथे जाण्यासाठी सकाळी मध्य रेल्वेच्या मानसरोवर स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्याऱ्या महिलांच्या राखीव साधारण डब्यात बसल्या. चेंबूर रेल्वे स्थानकात आशा शिंदे या गडबडीत उतरल्या. त्यावेळी बॅग रेल्वेत राहिली. बॅगची आठवण होईपर्यंत रेल्वे फलटातून निघून गेली.
आशा शिंदे यांनी ताबडतोब 1512 या हेल्पलाईनवर संपर्क साधून बॅगेची माहिती दिली. हेल्पलाईन कंट्रोल रुममधून माहिती मिळताच वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई (बक्तल नं. 1349) रविंद्र सोनवणे यांना माहिती मिळाली. सोनवणे यांनी तात्काळ कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई (बक्कल नम. 3524) हेमंत ठाकूर यांना बिनतारी संदेश दिला. माहिती मिळातच ठाकूर यांनी सदर रेल्वे गाडी चुन्नाभट्टी स्थानकात पकडून बॅग ताब्यात घेतली.
दरम्यान, प्रवासी आशा शिंदे यांना वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित एस. बारटक्के यांच्या समक्ष पोशि हेमंत ठाकूर यांच्या हस्ते परत केली. दागिने परत मिळाल्याबद्दल आशा शिंदे यांनी वडाळा लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.