
डोंबिवली : – दि. ११ ( प्रतिनिधी )
काडतूसांनी लोड केलेल्या पिस्तूलासह विष्णूनगर पोलिसांनी एका अग्निशस्त्र तस्कराला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. प्रशांत सुरेंद्र यादव (२३ ) असे या तस्कराचे नाव असून उद्या त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिम राजूनगर खाडी जवळ एक तरूण देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे विकण्याकरिता येणार असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपनिरीक्षक निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजय थोरात, संतोष जाधव, गोरक्ष शेकडे या खास पथकाने खाडीच्या किनारपट्ट्यात सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून जाळे पसरले होते. तब्बल ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर ३ वाजण्याच्या सुमारास खबरीने दिलेल्या वर्णनाचा तरूण दबकत दबकत तेथे आला. मात्र पोलिसांनी परिसरात फिल्डींग लावल्याची कुणकुण लागताच त्याने तेथून धूम ठोकली. तथापी पोलिसांच्या या पथकाने थरारक पाठलाग करून त्याला अटक केली .
त्याची चौकशी केली असता त्याचे नाव प्रशांत यादव असे सांगून पश्चिम डोंबिवलीच्या देवीचा पाडा येथिल देवदर्शन चाळीत सध्या चोरी-छुपे राहत असल्याची माहिती दिली. मूळचा उत्तरप्रदेशातील जागीपूर जिल्ह्यातील असलेल्या या तरूणाकडून १ लाख ५० हजार रूपये किंमतीचे पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अटक केलेला तरूण अग्निशस्त्र तस्कर असावा, असा पोलिसांचा संशय असून हस्तगत केलेले लोडेड पिस्तूल त्याने कोठून आणले ? या पिस्तूलाचा वापर करण्याचा त्याचा उद्देश काय ? हे शस्त्र कुणाला विक्री करायचे होते का ? या पूर्वी अशी किती शस्त्रे त्याने उत्तरभारतातून आणून कल्याण-डोंबिवली वा अन्य परिसरात विकली ? त्याच्या विरोधात तसे गुन्हे दाखल आहेत का ? याचा पोलिस मागोवा घेत असून त्यातून अग्नीशस्त्रतस्करांची मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.