डोंबिवली :-दि. १२ ( शंकर जाधव ) गेली ८० वर्ष कसत असलेल्या जमीनीबाबत लेखी हरकती घेउन सुध्दा कल्याणच्या भूमीअभिलेख कार्यालयाने बेकायदेशीर मोजणीबाबत आदेश दिले होते.या आदेशाविरोधात दावडी येथील भूमीपुत्र शेतकऱ्यांनी कल्याणच्या भूमीअभिलेख कार्यालयात उपअधीक्षकांच्या दालनाबाहेर नुकतेच ठिय्या आंदोलन केले. शेतकरी भूमीपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सदर जमीनीबाबत भूमीअभिलेख उप अधिक्षक प्रमोद जरक यांनी १० सप्टेंबर रोजी मोजणीचे आदेश दिले होते.
समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. न्यायालयाचा मनाई हुकुम असताना उप अधिक्षक जरक यांनी मोजणीचे आदेश दिले होते.त्यासाठी जरक यांना बडतर्फ करण्याची मागणी गणेश म्हात्रे यांनी केली आहे. समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी पत्रकाराना दिलेल्या माहितीप्रमाणे, कल्याण सोनारपाडा येथील दावडी गावातील भूमीपुत्र शेतक-यांची गेल्या ८० वर्षापासून मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीच्या जमिनीवर वडीलोपार्जित कब्जेवहिवाट आहे.ती जमीन स्वत: लागवड करून कसत आहेत. ह्या जमिनीवर २९ कुले असताना ती कुले बेदखल करुन शेतक-यांवर घोर अन्याय करण्यात आला आहे. शेतक-यांच्या या जमिनी मुबंई गोग्रास भिक्षा संस्थेने धर्मादाय आयुक्त यांची फसवणूक करुन मेसर्स अशर रियल्टर्स यांना विक्री करण्यात आली. या जमिनीची बेकायदेशीर मोजणी सुरु करण्याचा डाव असून कल्याणच्या दिवाणी न्यायालय यांनी अजय अशर यांचा अर्ज फेटालला असून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.असे असताना भूमीअभिलेख अधिक्षक प्रमोद जरक यांनी १० सप्टेंबर रोजी मोजणीचे आदेश दिले होते. दावडी येथील बेकायदेशीर मोजणीस जबाबदार असणाऱ्या तिन्ही अधिका-याना बडतर्फ करण्याची मागणी शेतकरी भूमीपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने गणेश म्हात्रे यांनी केली आहे.१९/११/२०१६ रोजी ठाणे येथील भूमीअभिलेख अधिक्षक बालासाहेब वानखेडे, कल्याणचे तत्कालीन उप अधिक्षक रमेश पराडकर, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गजानन काबदुले यांनी महसूल नियम गुंडाळून बेकादेशीर मोजणी केल्याचा आरोप करत रत्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे..