अहमदाबाद – जिल्ह्यातील नरोडा भागामध्ये बुधवारी एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींनी घरातील छताला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या काळ्या जादुच्या प्रभावातून करत असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये आढळून आले आहे. या सुसाईड नोटला न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
कुणाल त्रिवेदी (५०), त्यांची पत्नी कविता त्रिवेदी (४५) आणि मुलगी शिरीन त्रिवेदी अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांना या तिघांचे मृतदेह घराच्या छताला लटकलेले आढळून आले. पोलीस निरीक्षक एच. बी. वाघेला यांनी सांगितले, की आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र हे कुणाल त्रिवेदी यांनी लिहिलेले असावे. तसेच त्यांनी यामध्ये आपण काळ्या जादुच्या छायेत असल्याचे म्हटले आहे.
कुणाल यांनी त्यांच्या कुटुंबियांना आपल्यावर काळ्या जादुची छाया असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्यांना दारूचे व्यसन काळ्या जादुच्या प्रभावामुळेच लागल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. या प्रकरणी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.