डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवलीजवळील कोळे गावातील संते कुटुंबाचा गणपती शंभराव्या वर्षात पदार्पण करित आहे.`अंधश्रध्देवर विश्वास ठेवणारी एक पिढी तर रुढी परंपरेच्या बेड्या तोडणारी दुसरी पिढी`असा इतिहास सांगणारा संते कुटुंबाचा गणपतीचा उत्सव शानदार पध्दतीने आजही साजरा केला जातो. संते कुटुंबातील शिक्षक हनुमान संते शंभर वर्षापूर्वीचा इतिहास उलगडताना सांगतात.
१९१८ साली प्लेग व देवी रोगाने थैमान घातले होते.आपले अपत्य त्या जीव घेण्यारोगपासून दूर राहण्यासाठी धोंडू संते (खरडकर ) यांनी गणपतीला नवस केला. धोंडू संते यांचे अपत्य सुखरुप निपजले आणि संते कुटुंबाने दरवर्षीच्या गणेश चतुर्थीला श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.त्यांच्या घरी एकवीस दिवस गणपतीचा उत्सव केला जाई. त्यानंतर शिवराम धोंडू संते ( हनुमान सरांचे वडील ) यांनी एकदिवसा ऐवजी ४२ दिवस गणपतीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली.पूर्वी देवी आणि साथीचे आजारांमुळे अनेक नागरीक मृत्यूमुखी पडत होते. त्यासाठी आजोबांनी गणपतील नवस केला होता. माझा मुलगा वाचला तर मी गणपती बसवेन. स्वर्गीय शिवराम धोंडू यांनी १९१८ रोजी गणपतीची स्थापना केली. संते यांनी पहिल्यांदा २१ दिवस गणपती बसविला आणि नंतर ४२ दिवस ठेवला. यालाही वेगळे कारण होते. पूर्वीच्या वेळी समाजामध्ये प्रथा होती हरिजनांना विहिरीवर पाणी भरण्यास बंदी होती. परंतु याच हरिजनांना एकत्र करून त्यांना घरी आणले. ते हरिजन वाजंत्री होते, त्यांच्या बरोबर एकत्र जेवण करण्यास काही ग्रामस्थांचा विरोध होता. परंतु कोणतीही पर्वा न करता सतत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ दिली आणि त्यासाठीच ४२ दिवसांचा गणपती ठेवण्याची प्रथा सुरु झाली. जातीपातीचा भेदभाव आमच्या घरातून शंभर वर्षांपूर्वीच दूर झाला होता, याला कारण आमचे वडील समाजसुधारक होते आणि त्यांच्याच घरात आज गणेशाचा शताब्दी सोहळा होत आहे याचा आनंद होत आहे असे कोळेगावातील संते सांगतात. डोंबिवली जवळील कोळे गावात संते कुटुंब वास्तव्य करीत आहे. शेतीच्या व्यवसायाबरोबर शेळी व कुकुटपालनचा जोडधंदा आहे. गणपतीची मूर्ती पेण येथून आणली जात असून प्रत्येक वर्षी वेगवेगळी आरास केली जाते. शंभरावे वर्ष म्हणून या वर्षी शंभर ( १०० ) आकड्याची आरास करण्यात आली आहे. गणेशाच्या सभोवती पाण्याच्या धारा आणि प्रवेश करताच गणेशाचे दर्शन असा थक्क करणारा देखावा साकारण्यात आला आहे. शेतकरी अभिमन्यू संते यांचा मुलगा हेमंत संते यांनी संपूर्ण सजावट केली आहे. कोळे गावातील त्यांचे काका हनुमान संते हे शिक्षक असून त्यांनी अनके पुस्तकांचे लिखाण केले असून आगरी समाजातील मान्यवर व्यक्तींचा परिचय त्यांनी प्रकाशित केला आहे.