
अंबरनाथ दि. १७ (नवाज अब्दूलसत्तार वणू) अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान पडलेले खड्डे नागरिकांनी स्वतः बुजवल्याचा प्रकार समोर आलाय. यासाठी त्रस्त नागरिक फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले आणि गांधीगिरी करत खड्डे बुजवले.
अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान अनेक ठिकाणी पावसाळा सुरू।झाल्यापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्यांकडे एमआयडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणीही लक्ष देत नसल्यानं नागरिक हैराण झालेत. अंबरनाथच्या चिखलोली भागात असलेल्या डी मार्ट समोरही रस्स्त्यावर भलेमोठे खड्डे पडले होते. यातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांनी फेसबुकवर आवाहन करून गांधीगिरी पद्धतीने स्वतः हे खड्डे बुजवले. यासाठी बदलापूरच्या महेश आपटे यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यात सहभागी झालेले सगळे नागरिक हे रोज नोकरी-धंद्यानिमित्त याच रस्त्यावरून प्रवास करणारे असून त्यांनी शनिवार-रविवारच्या सुट्टीचा उपयोग करत हे खड्डे बुजवले. यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या शासकीय यंत्रणांच्या डोळ्यात मात्र जळजळीत अंजन घातलं गेलं असून आता तरी यंत्रणांना जाग येते का? हे पाहावं लागणार आहे.