ठाणे दि १५ सप्टेंबर : भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या अभियंता दिनी ठाणे जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अभियंताना आदर्श अभियंता पुरस्कार देवून जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. जिल्ह्याधिकारी आवारातील नियोजन भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, महिला व बालकल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी ठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेचे अभियंता करत असलेली कामं ही कौतुकास्पद असल्याचे सांगत उत्तम काम करणाऱ्या अभियंतांचा गौरव होणे उचित असल्याचे नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी देखिल अभियंताना मार्गदर्शन करताना सांगितले की काम करतांना अडचणी हया येणारच परंतु सर्व अडचणीवर मात करून कामास प्राधान्य दयावे व दर्जेदार काम करावे. यावेळी बी.एस.महाले (शाखा अभियंता बांधकाम विभाग) एम.डी.क्षिरसागर (शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) जे.पी.पाटील (स्था.अभि.सहा.बांधकाम विभाग) आणि सेवानिवृत्त शाखा अभियंता सुर्यकांत वासुदेव पाटील यांना आदर्श अभियंता म्हणून गौरवण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुभाष पवार, बांधकाम सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप देशमुख यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष डि.ए.गिते यांनी मनोगत व्यक्त केले. तर ए.बी.चव्हाण (कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग) मोहन पवार (राज्यस्तरीय उपाध्यक्ष) एम.एम.इंदुरकर (जिल्हा जलसंधारण अधिकारी ) राधेश्याम आडे (कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) हयांनी शुभेच्छापर भाषण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.आर.तोरवणे (वरिष्ठ सहायक बांधकाम विभाग) तर आभारप्रदर्शन आर.पी. पाटील यांनी केले .
उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अभियंताना आदर्श अभियंता पुरस्कार देवून गौरव
