महाराष्ट्र

बेकायदा वाळू उत्खननाला तहसीलदारांचा दणका

सोलापूर : चोरीची वाळू आणि मुरुम उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांसह एका पोकलेन मशिनवर मोहोळ महसूल प्रशासनाने कारवाई केली. या वाहनांना तब्बल १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून वाहनमालकांना दंड भरण्या संदर्भात नोटीसादेखील काढण्यात येणार असल्याची माहिती मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मोहोळ महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक आणि मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी दोन कारवाई पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मोहोळ (हिंगणी ता.मोहोळ) येथे पोकलेन मशीनद्वारे मुरुम खोदून डंपरद्वारे वाहून नेला जात असल्याची माहिती प्रशासनास मिळाली. त्यानुसार तसीलदार जीवन बनसोडे यांच्या पथकाने हिंगणी येथे एक पोकलेन मशीन व दोन डंपर अशी वाहने जप्त केली. या कारवाईमध्ये पंचनामा केल्यानंतर पोकलेन मशीनला नियमा नुसार सात लाख पन्नास हजार रुपये दंड का आकारू नये अशी नोटीस देण्यात येणार आहे. तसेच दोन डंपरवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर एक मालवाहू छोटा हत्ती वाहन वाळू घेऊन जाताना मोहोळ परिसरात आढळून आले. त्यावर देखील कारवाई करण्यात आली. याशिवाय एक ट्रॅक्‍टर देखील वाळूची वाहतूक करताना या पथकास आढळून आला. त्यामुळे सदरच्या छोटा हत्ती वाहनास एक लाख नऊ हजार रूपये दंडाची तर वाळु ट्रॅक्टरला एक लाख ३५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

याशिवाय (शिरापूर ता. मोहोळ) येथे देखील मुरुम वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई करून दोन लाख दहा हजार रुपयांच्या दंडाची पंचनामा नोटीस बजावण्यात आली आहे. सदरची वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे. सदर वाहन मालकांनी दंडाची पूर्तता केली तरच सदरची वाहने त्यांच्या ताब्यात दिली जाणार आहेत अशी माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

या कारवाईमध्ये मोहोळचे नायब तहसीलदार किशोर बडवे, महसूल नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांच्यासह मंडल अधिकारी सहभागी झाले होते. अशा पद्धतीची कारवाई मोहीम निरंतर चालू राहणार असून ज्या ज्या भागात वाळूची चोरी होत आहे, तसेच बेकायदा उपसा होत असेल त्या भागातील नागरिकांनी थेट तहसील कार्यालयाशी अथवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मोहोळ महसुल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या पुढील काळात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ महसूल प्रशासन सुरू ठेवणार आहे असल्याचेही यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!