नवी दिल्ली – चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेला पुढील आदेशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यात घडली होती.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षते खालील खंडपीठाने विनोदच्या याचिकेवर सुनावणी करताना मध्यप्रदेश सरकारला नोटिसदेखील बजावली आहे. दोषी ठरलेल्या विनोदने १३ मे २०१७ रोजी ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.
२८ फेब्रुवारीला सुनावण्यात आली होती फाशीची शिक्षा –
शहडोल येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने गेल्या २८ फेब्रुवरी रोजी विनोदला फांशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात विनोदने मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही घटना अतिशय दुर्मीळ असल्याचे म्हणत खालच्या न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात विनोदने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.