
ठाणे दि १८ सप्टेंबर : स्वच्छता हे केवळ अभियान न राहता ती लोक चळवळ व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने व्यापक स्वरुपात स्वच्छतेची मोहीम हाती घ्यायला हवी असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी केले. स्वच्छता ही सेवा या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा आज जिल्हास्तरीय शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला . त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषद सदस्य, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पुढील पंधरा दिवस अभियान कसा प्रकारे राबवले जाणार आहे याची कार्यशाळाही यावेळी पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्वच्छते संदर्भात विविध उदाहरण देत स्वच्छता का महत्वाची हे पटवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी जिल्ह्यातील हागणदारीमुक्त गावांचा आढावा घेत हागणदारीमुक्ततेचे उद्दिष्ट्य साध्य केले आहे. आता सांडपाणी – घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे सांगितले. उपस्थित असणारे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, कैलास जाधव, अरुण भोईर आदी सदस्यांनी जिल्हा स्वच्छ सुंदर होण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील याबाबत मत व्यक्त केले. शिवाय या मोहिमेत सातत्य राहावे यासाठी शालेय विद्यार्थीना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
उपस्थितांनी घेतली स्वच्छतेची शपथ
या अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या शपथेतून व्यक्तीगत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन करावे असे आवाहन करण्यात आले. तर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी रेड्यूस. रिसायकल, आणि रियुज या सिद्धांताचा स्वतः अंगीकार करून इतरांना प्रोत्साहन करण्यात यावे असेही शपथ घेतना सांगण्यात आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा ) चंद्रकांत पवार यांनी शपथीचे वाचन केले.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येणार असून या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व, आदि स्पर्धा आयोजित करून विद्यार्थांमध्ये स्वच्छते विषयी जागृती केली जाणार आहे. तसेच बचत गट मेळावे आयोजित करणे, गृहभेटी देणे, एकत्रित श्रमदान करणेआदि उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहचवण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य गावांना भेटी देणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे पन्नास नोडल अधिकारी नेमण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.