अंबरनाथ दि. १९ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
अंबरनाथच्या शिवधाम कॉम्प्लेक्समधील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गणरायाला प्रसाद, हार फुले न आणता पुस्तके आणावीत, असे आवाहन अंबर भरारी या संस्थेने केले आहे. त्यालाच प्रतिसाद देत सुनील चौधरी यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे बाप्पांसमोर प्रसाद म्हणून पुस्तके वाहत आहेत.
अंबरनाथ शहराला पुस्तकांचे गाव करण्याच्या उद्देशाने अंबर भरारी या संस्थेने शहरात १०० वाचनालये सुरू करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी शैक्षणिक, साहित्य, कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील पुस्तके गोळा करण्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. शहरातील नागरिकांना आवाहन केल्यानंतर आतापर्यंत १५ हजार पुस्तके अंबर भरारीकडे जमा झाली आहेत.
गणपती उत्सवात देखील त्यात हातभार लागावा म्हणून ‘प्रसाद नको पुस्तके द्या’ ही संकल्पना चौधरी यांनी राबवली आहे. त्याला भाविकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक आपल्या हातात पुस्तक घेऊन ती बाप्पाच्या चरणी वाहत या संस्थेच्या कामात सहभागी होत आहे. अंबरनाथ शहरातील विविध भागात ही वाचनालये सुरू केली जाणार आहेत.