मुंबई : पुणे – मुंबई प्रवासादरम्यान हरवलेला लॅपटॉप व 2 चार्ज असलेली बॅग अवघ्या 15 मिनिटांत शोधून विद्यार्थ्याला परत केली. ही उत्तम कामगिरी मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई (बक्कल नं. 11.1325) केशव वरकुटे यांनी केली. हरवलेला लॅपटॉप व कागपत्रे परत मिळाल्याने विद्यार्थ्याने पोशि केशव वरकुटे यांचे आभार व्यक्त केला.
मूळचा सोलापूरचा असलेला यश पांडुरंग वाघमोडे हा 20 सप्टेंबर 2018 रोजी पुणे-मुंबई प्रवास एका खाजगी वाहनाने करत होता. सकाळी 9 च्या सुमारास यश महेश्वरी उद्यान येथे वाहनातून उतरला. वाहन निघून गेल्यानंतर यशला वाहनच्या डिकीत ठेवलेल्या लॅपटॉपच्या बॅगेची आठवण झाली. काय करावे या विचारात असताना त्याला समोर माटुंगा पोलीस ठाण्याची बिट चौकी क्र. 03 दिसली.
तब्यत बरी नसल्याने औषध घेऊन परत येत असलेल्या पोशि केशव वरकुटे यांना यशने सर्व हकीगत सांगितली. त्याला दुचाकीवर बसून पोशि वरकुटे दादर टी टी येथे आले. यश याने सांगितल्यानुसार वाहनाच्या काचेवर निळ्या अक्षरात “बुद्धाय नम:” लिहिलेल्या वाहनाचा पोशि वरकुटे शोध घेऊ लागले. तुटकशी माहिती व वाहनाचा प्रकार माहिती नसतानाही पोशि केशव वरकुटे यांनी अवघ्या 15 मिनिटात वाहन चालकाचा शोध घेऊन 35 हजार रुपयांचा लॅपटॉप, 4 हजार रुपयांचे 2 चार्जर, कागपत्रे (एकूण 39 हजार रुपये) असलेली बॅग ताब्यात घेतली.
माटुंगा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष सदर बॅग विद्यार्थी यश वाघमोडे याला पोशि केशव वरकुटे यांनी परत केली.
या चांगल्या कामगिरीबद्दल वरिष्ठांनीही पोलीस शिपाई केशव वरकुटे यांचे अभिनंदन केले.