
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या त्या 27 गावांपैकी कावळ्यांचे गांव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबार्ली गावात घरोघरी विविध प्रकाराचे गणपती देखावे मनमोहक आहेत. पर्यावरण प्रेमींनी विविध नैसर्गिक साधन-सामुग्रीचा वापर करून निर्मित केलेली मंदिरे गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
उंबार्ली गावातील समाजसेवक तथा शिवसेना विभागप्रमुख सुखदेव पाटील यांच्या सहयोगाने सदर गावातील गणेशोत्सवाचा अनुभव घेता आला. गावागावात घराटीप मंगलमूर्तींची स्थापना करण्यात आली असून बहुतेक गांव माळकरी पंथाचा आहे. पिंटू दामू पाटील यांनी भुईमुगाच्या शेगांपासून मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्रत्येक वर्षी गोट्या, चॉकलेट, धाग्याची रीळ आदी वेगवेगळ्या साधनांपासून मंदिरे बनविण्याची त्यांची हातोटी आहे. यावर्षी देखावा सादर करण्यासाठी त्यांना 85 किलो भुईमुगाच्या शेगां लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या देखाव्यात चलचीत्रांची सांगड हा मुख्य विषय असतो. सुखदेव पाटील यांनी बांबूपासून गणेश मखराची निर्मिती केली. गावातील वैभव सुरेश भोईर यांनी सोमनाथ मंदिर कलश, गाभा मंदिर कलश माध्यमातून भव्य मंदिराची प्रतिकृती निर्मित केली आहे. परंतु कार्डपेपर माध्यमातून मंदिर निर्मितीसाठी त्रासदायक असल्याचे सांगून ते परवडणारे नाही अशी पुष्टी जोडली. पूर्वी गावांत देखाव्याची स्पर्धा असे आणि त्यामुळेच विविध होत गेली. महेंद्र विठू पाटील यांनी हुबेहूब नारळाची भव्य प्रतिकृती देखावा तयार केला असून यासाठी त्यांनी कापूस आणि नारळाच्या शेड्यांचा मोठ्या प्रमाणत वापर केला आहे. तर गंगाराम तुकाराम मढवी यांचा गणपती देखावा म्हणजे संगीत सभाच साकार केली आहे. त्यामध्ये तबला, ढोलकी, हार्मोनियम, तंबोरा आदी वाद्यांच्या सानिध्यात काल्पनिक मंदिरात गणेशाची मूर्ती स्थानापन्न झाली आहे. मढवी यांचा डेकोरेशन हा व्यवसाय असून सुमारे 70-80 मखरांची निर्मिती त्यांचे कुटुंबीय करीत असते. परतू थर्माकोलवर बंदी आल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे परिस्थिती खूप कठीण आहे असे त्यांनी सांगितले. असे असले तरी मात्र गावांत घराघरात मनमोहक सजावट साकारण्यात आल्यामुळे उंबार्ली गांव चर्चेचा विषय होत आहे. उंबार्ली कावळ्यांचे गांव असे प्रचलित असले तरी मात्र गणेशोत्सवात ते देखाव्याचे गांव म्हणून बघितले जाते.