ठाणे : नालासोपाऱ्यामध्ये सिरीयल रेपिस्ट दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नालासोपाऱ्यात 4 दिवसात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अल्पवयीन मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवल्यानंतर हा सिरीयल रेपिस्ट नालासोपाऱ्यात दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
25 ते 35 वयोगटातील एक वासनांध नराधम अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवतो. त्यानंतर “तुझ्या वडिलांनी मला तुला न्यायला पाठवले आहे, तुझ्या वडिलांचे पार्सल आले आहे” अशा खोट्या बतावण्या करून मुलींना अज्ञातस्थळी, जुन्या ईमारतीच्या छतावर, किंवा निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करुन फरार होतो. नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात या नराधमा विरोधात बलात्कार आणि विनयभंग असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर याठिकाणी या सिरीयल रेपिस्टवर आत्तापर्यंत 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पालघर पोलिसांनी नागरिकांना सिरीयल रेपिस्ट बाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नराधमाचे फोटो प्रसिद्ध करून नागरिकांनी, पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्या मुलींना या नराधमाबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणीही अनोळखी व्यक्ती खोटी किंवा चुकीची माहिती देऊन जर फसवणूक करून लहान मुलींना त्याच्यासोबत घेऊन जात असेल तर तत्काळ आरडाओरडा करुन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे.