मुंबई, दि.23 : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले. नैसर्गिक, पारंपरिक पद्धतीने आणि प्रदुषणमुक्त सण साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री.फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवात सामाजिक अभिसरण होत असते. या उत्सवात समाजातील भेदभाव टाळून संघटीत शक्ती आपण ईश्वरास अर्पित करीत असतो. उत्सवांची रचना ही निसर्गाशी साधर्म्य साधणारी असल्याने उत्सवात निसर्गाचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. पारंपारिक वाद्यांमध्ये अनोखा उत्साह असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करावयास हवा, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.