पूर्वी कोकण गरीब होते. गावे भोळी-भाबडी ,साधी होती. माणसे गरीब होती. प्रेम आपुलकी होती.शेती करून पोट भरत होतो. भात, नाचणी, वरी, कुळीथ , उडीद, हरिक ही पीक पिकवून बाराही महिन्याचे दिवस उजाळलेले असायचे.नाना -तऱ्हेच्या भाज्यांना तर कमतरता नव्हती. परसवात आठ दिवसाने टोपलीभर भाजी तयार होत होती.शेतीला जोडव्यवसाय म्हणून डझनभर गुरे -ढोरे होती. घरात घागरभर दूध दुभतं होते आणि कोणाकडे नसेल तर मागील दाराने शेजाऱ्याकडून चहा पुरते आणून पाहुण्यांचे आदरातिथ्य होत होते. डोलगाभर कोंबड्याही होत्या.घरात सात -आठ माणसे असूनही तीन वेळचे कसंबसं पोटभर अन्न मिळत होत.पेज,जाडा तांबडा भात,हरकाचा भात , नाचण्याची भाकरी, कुळथाची पिटी आणि कधी ना कधी सुकी भाजलेली तारली किंवा बांगडा खाऊन मन तृप्त होत होत. त्याला अमृताची चव येत होती आणि रात्री निजताना डोक्यावर पळीभर खोबरेल तेल घसघसून घासायला मिळाले की आम्ही ऐहिक जगातल्या सुखाच्या राशीवर लोळत होतो. आमचे ते दिवस मंतरलेले होते. पैसा गाठीला नसला तरी ते वैभव आणि खरी श्रीमंती होती.पण आजची कोकणची परिस्थिती तशी राहिली नाही.गावा-गावात भांडणे,वाडीवस्तीत भांडणे ती कमी की काय म्हणून घरा-घरात,भावा-भावात,वडिल-मुलग् यात या ना त्या कारणांवरुन कायम भांडणे दिसतात.कधी घरावरुन तर कधी जमिन-जुमल्यावरुन,झाडा-माडांवरु नही मारा-मा-या,भांडणे होत आहेत.हे कशाचे लक्षण आहे याचे उतर मात्र आम्हा मुंबईकर चाकरमान्यांना सापडले नाही.
नोकरिनिमिताने आम्ही परंपरे प्रमाणे मुंबईत आलो आणि मुंबईतल्या जीवनशैलीचे गावाला बरे वाईट परिणाम दिसू लागले. गेल्या काही वर्षात हळू हळू कोकणात जीवनशैली बदलू लागली आणि आमचे भोळे भाबडे गाव हरवून बसलो. गावात शहरी जीवनशैलीच अनुकरण होऊ लागल. आता तसेच झाल्याचे दिसून येते.दिवस बदलत आहेत. गावात सरकारच्या आशीर्वादाने पिवळ्या आणि केसरी रेशनकार्डावर तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात किलोभर गहू मिळू लागले आणि नाचणी , वरीची भाकरी मागे पडत चपाती दिसू लागली. हरिक, वरी ही कॅल्शियम युक्त धान्ये जवळ जवळ संपून गेली. आता तर आम्ही जमिनीच संपवायला निघालोय.पण हे असेच चालू राहिले तर मात्र भविष्यकाळ धोक्यात आहे.आम्हीच आमच्याच हक्काच्याच जिल्ह्यात,तालुक्यात,गावात,वाडी त आणि घरातही परके होऊ नव्हे पाहुणेच होऊ हे सांगायला कोणा ज्योतीषाची गरज नाही.कारण आज पैशाच्या आशेने लाखमोलाची जमिन परप्रांतियांच्या घशात कवडीमोलाने घालून श्रीमंत असल्याचा आव आणत आहोत.असेच सुरु राहिले तर आपण आपल्या सुनांना,नातवंडे यांना आपले गाव कसे न कोणते दाखवण्यासाठी घेऊन जाणार.
चहापुरते दूध,सारवायला शेण हवे म्हणून गुरे ठेवून कुठेतरी भात शेती दिसतेय.पण ती करताना आधुनिक यंत्राने करू लागलो.कोल्हापूरवरून येणारे वारणा आणि गोकुळ दूध व घाटावरच्या भाजीवर कोकण जगू लागले.आजच्या घडीला कोकणातही बांधावरची भाजी नव्हे तर ती बाजारातील भाजीच घरात येत आहे.पालीव कोंबडा/कोंबडीचे चिकन न होता बाजारातील भाजीची चव असलेली बाँयलरच घरी आणली जात आहे.३०-३५ वर्षांपूर्वीचे कोकण आता नजरेज नाही पडत.काळानुसार प्रगतशील व्हायला हवे याला आमचा विरोध नाही.पण जेथे व्हायला हवा तेथेच बदल व्हायला हवा होता.सद्यस्थितीत मुंबई आणि कोकणच्या गावातील राहणीमान एकच झाल्याचा भास होत आहे.पण हे कोकणासाठी फारच घातक होत आहे हे कोकण भुमीपुत्रांनी विसरुन चालण्यासारखे नाही.
लग्न समारंभही मुंबईसारखे होऊ लागले.पण पत्रावळीवर असलेल भाताचे मूद,गोडी डाळ, काळ्यावाटण्याची उसळ, खीर, वडे हे आपले पारंपरिक सात्विक जेवण मागे पडले. पुऱ्या, कुर्मा भाजी, छोल्याचे जेवण मुंबईसारखे जेवू लागलो.असे नाना तऱ्हेचे बदल दिसू लागले.पूर्वीच्या नळ्या, कौलारू, लाकडी अशा गार गार आणि हवेशीर घरांऐवजी स्लबची आणि लोखंडाची आकर्षक घरे जागो जागी दिसू लागली. ती फक्त सणासुदी पुरती उघडू लागली आहेत.हे कशाचे लक्षण म्हणावे?गावची खुशाली पत्रव्यवहार हे मोबाईल फोन, व्हाँट्सअप आणि मनिऑर्डर या बँक ट्रान्सफर द्वारे होऊ लागले.
सर्वसाधारण सध्या मुंबईची जीवन शैली तीच कोकणची जीवन शैली बनू लागली.आम्ही गाव सोडून मुंबईला आलो.याचे दुःख अजिबात नाही त्यामुळे प्रगती झाली याचे समाधान जरूर आहे.पण माझे भोळेभाबडे गाव आता कायमचे हरविले याचे शल्य तुमच्या- माझ्या मनात कायम राहणारे आहे.तेव्हा कोकण भुमिपुत्रा जागा हो….कोकणातील आपल्या खेड्याकडे,गावाकडे लक्ष दे नाहीतर भविष्यकाळ धोक्याचा आहे.