प्रासंगिक लेख

‘मुखवटे’

तुझी माझी मैत्री म्हणजे
आयुष्याचा ठेवा,
मुखवट्याच्या गर्दीमधला
खात्रीचा विसावा …….
     असे जरी आपण म्हटले तरी कोणाचीच खात्री आता देता येत नाही. चेहऱ्यावर मुखवटे घालून वावरणारी माणसे प्रत्येक क्षेत्रात इतकी वाढली आहेत की खऱ्या-खोट्याचा फरकच समजेनासा झाला आहे. पण जेव्हा हे मुखवटे गळून पडतात तेव्हा आपला पुरता भ्रमनिरास होऊन जातो आणि आपण हतबुद्ध होण्याशिवाय पर्याय नसतो.
     एखाद्या लहान मुलाला आपण हलकेच हवेत उडवून परत अलवार झेलतो. जेव्हा ते बाळ हवेत असते तेव्हा ते रडत नाही तर हसत-खिदळत असते. खाली पडणार नाही, आपण त्याला झेलणार हा त्याला विश्वास असतो, त्याचे विश्वच निरागसतेचे असते. ते मूल जस-जसे मोठे होत जाते आणि आई-बाबा, आजी-आजोबा, दादा-ताई यांच्या पलीकडच्या जगात प्रवेश करते तेव्हा त्याला जीवनाचे बरे-वाईट पैलू कळायला लागतात. शाळा-कॉलेजमध्ये जाऊ लागले की आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे त्याला कळायला लागतात. त्याच्या निरागसतेच्या जगात भेसळ होऊ लागते. हे झाले लहान मुलांचे…पण मोठ्या माणसांचे जगही विश्वासावरच चाललेले असते…जोपर्यंत एखाद्याचा मुखवटा गळून पडत नाही तोपर्यंत.
     सात जन्माची साथ देण्याचे वचन देणारा, रात्रंदिवस आपल्यासोबत राहणारा जोडीदार….सर्व आलबेल सुरू असताना अचानक वयाच्या चाळिशीनंतर सांगतो की आपले या पुढे एकत्र राहणे शक्य नाही…तेव्हा पायाखालची जमीन निघून जात आहे असे वाटते. इतके दिवस हसतखेळत आपल्यासोबत राहणारा हाच का असा प्रश्न पडतो…..कोणता मुखवटा घालून हा राहत होता? शोना बोरा हत्याकांडातील आई स्वतःच्या मुलीची हत्या करत असताना त्या मुलीला आईच्या त्या ममतेच्या मुखवट्याच्या आतील स्वार्थी बाई दिसली असेल  तेव्हा तिला घृणाच आली असावी.
     १०-१२ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बेटिंग किस्से पाहिले आणि दोन वर्षांपूर्वी IPL मध्येही पाहिले. स्पर्धा सुरू असताना सगळे निरागसतेने वावरत होते; पण हळूहळू हे निरागसतेचे मुखवटे उतरू लागले. बेटिंगमध्ये सर्वांचा बळी गेला. यात या क्रिकेट टीमच्या मालकांचाही समावेश होता. बाकीच्या खेळांचेही कमी जास्त प्रमाणात हेच आहे पण फक्त ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होतही नाहीत आणि प्रसिद्धीच्या फेऱ्यात येतही नाहीत.
     राजकारणाविषयी तर बोलायलाच नको. हे तर सर्व ज्ञात आहे. ही नेतेमंडळी तर एकाच वेळी अनेक प्रकारचे मुखवटे घालून समाजात वावरत असतात. कोणत्यावेळी कोणता मुखवटा घालायचा ह्यात ते पारंगतच असतात. त्याविषयी अधिक बोलणे नकोच..ते सर्व ज्ञात आहे. ज्यांचे मुखवटे गळून पडतात ते सर्व ढोंगीच असतात असे नाही कर्तुत्ववानही असतात. हर्षद मेहता, बी. रामलिंग राजू हे तर खूप हुशार होते म्हणूनच त्यांचे उद्योग इतके मोठे झाले. पण हुशारी नक्की कुठे वापरावी ते न कळल्यामुळे  ‘सत्यम’ रसातळाला कधी गेली कळलेच नाही. हे सर्व एक दिवसात होत नसते. आपण आता यशाच्या शिखरावर आहोत आणि आता आपण खाली येऊच शकणार नाही हा अहंकार मनात असतो पेक्षा गैरसमजूत असते. पण अशी माणसे कधी ना कधी पकडली जातातच मग ते कोणीही आणि कितीही मोठे असोत. भिशीचे पैसे, पतपेढ्या, बँका बुडवणारे लोक आपल्याकडे कमी नाहीत. त्यांचा बुरखा फाटतोच पण यामध्ये सामान्य जनतेचे नुकसान खूप होते. पै पै जमा करून ठेवलेली रक्कम घेऊन अचानक कोणी पोबारा करते तर कधी चांगली चाललेली बँक अचानक बंद झाल्याची नोटीस ग्राहकांना पाहायला मिळते. समाजात उजळ माथ्याने फिरणारे कार्यकारी मंडळच पैसे खाऊन गप्प झालेले असते. शिक्षण क्षेत्रही यात मागे नाही. इथेही पैसा कमावणे ह्यालाच प्राधान्य असते.  त्यामुळे मुखवटे आणि चेहरे वेगवेगळे राहिले नाहीत इथेही.
     वरती सांगितलेल्या लहान बाळाचा आपण विश्वास गमावतो आहोत का? की मुखवटे ओळखण्यात आपण कमी पडतो आहोत?असा प्रश्न पडतो कधी-कधी. तुम्हा-आम्हाला रोजच्या रोज असे मुखवटे धारण करून वावरणारे लोक भेटत असतात आणि आपण बहुतेकवेळा तो मुखवटा ओळखतोही पण आपण काहीच करू शकत नाही.
     याचा अर्थ जगात फक्त मुखवटे घालू फिरणारेच आहेत असे नाही, मुखवटे न लावलेली खऱ्या चेहऱ्याची माणसे जास्त आहेत म्हणूनच तर हे जग चालले आहे. मुखवट्यांच्या या जगात आपणच आपला खात्रीचा विसावा शोधायचा नेहमी प्रयत्न करू या….
सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!