मुंबई : गणपती विसर्जना दिवशी मुंबईत चोऱ्या करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या 2 चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून 4 लाख 92 हजार रुपयांचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही धडाकेबाज कारवाई दादर लोहमार्ग पोलिसांनी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मोबाईलपैकी 7 मोबाईल मालकांचा पोलिसांनी शोध घेतला असून, मोबाईल मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.
गणेशोत्सव काळात मुंबईतील चिंचपोकळी येथील “चिंतामणी”, “लालबागचा राजा” या गणपतींच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त दरवर्षी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दादर लोहमार्ग पोलिसांचा दादर ते चिंचपोकळी रेल्वे स्थानकांदरम्यान चोख बंदोबस्त तैनात होता. गणपती विसर्जना दिवशी होणाऱ्या गर्दीत चोऱ्या करण्यासाठी दिल्लीतून एक टोळी मुंबईत आली होती. या टोळीत हरिषकुमार अमरसिंग (30) चोरट्याला चिंचपोकळी स्थानकात कर्तव्यावर असलेल्या दादर लोहमार्ग पोलिसांनी 17 हजार रुपयांचा मोबाईल एका गणेशभक्ताच्या पॅन्टच्या खिशातून काढताना रंगेहाथ पकडले. हरिषकुमार याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे व ठावठिकाणा सांगितला. त्या माहितीच्या आधारे दादर लोहमार्ग पोलिसांनी 2 टाकी येथील एका लॉजवर छापा मारला. त्या लॉजमधील एका रुममध्ये सोनू रामकिशन शर्मा (28) पोलिसांना भेटला. त्या रुमची झडती घेतली असता 4 लाख 75 हजार रुपयांचे 20 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. हरिषसिंग व सोनूकडून 4 लाख 92 हजार रुपयांचे 21 मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
या प्रकरणी दादर लोहमार्ग पोलिसांनी (गु. र. क्र. 2387/18) भादंवि कलम 392, 34 सह भारतीय रेल्वे कायदा 147 नुसार गुन्हा दाखल करून हरिषकुमार व सोनूला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 27 सप्टेंबर 2018 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या चोरट्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
दिल्लीच्या या चोरट्यांना मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, दादर लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाजे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर बारड, हवालदार (बक्कल नं. 2266) हरिश्चंद्रे, हवालदार (2100) कदम, पोलीस नाईक (बक्कल नं. 3180) गावकर, पोलीस नाईक (बक्कल नं. 3088) रौंधळ, पोलीस शिपाई (बक्कल नं. 2877) टिंगरे, पोलीस शिपाई (बक्कल नं. 2334) पाटील, पोलीस शिपाई (बक्कल नं. 2273) बच्चे, पोलीस शिपाई (बक्कल नं. 1608) खैरनार, पोलीस शिपाई (बक्कल नं. 1056) राठो़ड, पोलीस शिपाई (बक्कल नं. 3497) पाडुळे, पोलीस शिपाई (बक्कल नं. 524) पवार आदी दादर लोहमार्ग पोलीस पथकाने अटक करण्यात उत्तम कामगिरी बजावली.