ठाणे(२६): ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाची धडक कारवाई आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ठाणे महानगरपालिका व मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण यांच्यावतीने ही कार्यवाही करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये कौसा बायपास टोलनाका ते भारत गिअर कंपनी, दुवा अपार्टमेंट शिबलीनगर, वाय जंक्शन या रोडवरील ६ मोठ्या इमारती, 30 छोटी बांधकामे, भारत गिअर कंपनीचा काही भाग तसेच काही खाजगी जागेत ही कारवाई करण्यात आली.
सद्यस्थितीत ३५ मीटरचा रस्ता उपलब्ध असून या रस्ता रुंदीकरणामध्ये 60 मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या रुंदीकरणामध्ये जमीन हस्तांतराची प्रक्रिया सुरु असून सुमारे १९० कुटुंबांचे पुनर्वसन महापालिकेने केले आहे.
दरम्यान रस्त्याच्या बाजूचे पाईपलाईनचे काम तात्काळ एमएमआरडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरबल्ले, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर,मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण मुख्य अभियंता श्री.पाटील, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप, झुंजार परदेशी, उप नगर अभियंता राजन खांडपेकर,कार्यकारी अभियंता मनोज तायडे,प्रशांत पाठक,धनंजय गोसावी आदीसह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
.