मुंबई : जीवन साथी डॉट कॉमवरून ओळख झालेल्या 24 वर्षीय तरुणीने लग्नास नकार दिल्याने फेसबुकवर बोगस अकाऊंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या तरुणाला 25 सप्टेंबर 2018 रोजी पुण्यात अटक करण्यात आली आहे. ही उत्तम कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 च्या पथकाने केली. पुडील कारवाईसाठी तरुणाला खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
लग्नासाठी तरुणीच्या पालकांनी तिची माहिती जीवन साथी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावर नोंदवली होती. सदर माहितीवरून सुंदर मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव पुण्याच्या सुशांत करडे (30) या तरुणाने तिच्या पालकांसमोर ठेवला. मात्र प्रशांतच्या बाबतीत काही गोष्टी मनासारख्या नसल्याने मुलीने व तिच्या पालकाने लग्नास नकार दिला. उच्चशिक्षित, चांगला कमवता असूनही लग्नास नकार दिल्याने सुशांत संतापला. याचा वचपा काढण्यासाठी सप्टेंबर 2017 महिन्यात सुशांतने फेसबुकवर तरुणीच्या नावाने 2 बोगस अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवर तरुणीचा व तिच्या मित्राचा नंबर तसेच अश्लील व्हिडीओ, फोटो अपलोड केले. एवढ्यावर न थांबता सेक्ससाठी संपर्क साधण्याचे आवाहन त्या फेसबुक अकाऊंटद्वारे केले. सदर माहिती व्हायरल होताच तरुणीला व तिच्या मित्राला रात्री अपरात्री फोन येऊ लागले. सेक्स करण्याची मागणी, अश्लील संभाषण फोनवरून होऊ लागले. वारंवार येणाऱ्या फोनला वैतागून तरुणीने अखेर 14 फेब्रुवारी 2018 रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 354( ड), 509, 504, 501 सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 67, 66(क) नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 च्या पथकाला दिले. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकाने सायबर सेल पोलीस पथकाकडून माहिती मिळवली. त्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान आरोपी पुण्याचे असल्याची माहिती समजताच पोलिसांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी पुण्यात जाऊन सुशांत करडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा करण्यामागचे कारण स्पष्ट केले.
सुशांतच्या बाबतीत दुर्दैव म्हणजे 4 महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. पण रागापोटी केलेले पूर्व कर्मामुळे त्याला तुरुंगात जावे लागले.
हा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण – 1 चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी – पश्चिम) अभय शास्त्री, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले, पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर, प्रथमेश विचारे, हिंदुराव चिंचोलकर, लक्ष्मण वडरे, वरदराज पारशी, सायबर सेल पथकाचे अंमलदार उल्हास सावंत, रवींद्र माने, प्रदीप घरत, आनंद तावडे, चंद्रकांत जगताप, अंकुश साळवी, सूर्यकांत जातेकर, सुरेश जमदाडे, जयेंद्र कानडे, विश्वास भगत, वसंत यादव, प्रकाश मळेकर, किशोर पटेल, राजेश फिरके, एकनाथ उतेकर, नागनाथ गिरी, सचिन सुतार आदी पोलीस पथकाने उघडकीस आणण्यात उत्तम कामगिरी बजावली.