गुन्हे वृत्त

सव्वा दोन लाखांची लाच घेणाऱ्या या तलाठ्यासह दोघांना सक्तमजुरी

सोलापूर : सात-बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया तलाठ्यासह एका खासगी इसमास सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी सुनावली.

तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, दक्षिण सोलापूर) याला चार वर्षे सक्तमजुरी तर खासगी इसम बापू शंकर कोकरे (वय ५३, रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर) यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.तक्रारदार यांची होटगी येथे वडिलोपार्जीत जमीन आहे. त्यापैकी काही क्षेत्रामध्ये तहसीलदार यांचे बिगरशेती आदेश पास झाले. नंतर बिगरशेती क्षेत्रामध्ये तक्रारदार यांनी ८४ प्लॉट पाडून त्यापैकी ३० प्लॉटची विक्री केली. त्यांनी शिल्लक सात प्लॉटची विक्री करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तलाठी जालिंदर सप्ताळे यांच्याकडे सात-बारा उताºयाची मागणी केली असता त्याने हे काम करण्यासाठी पैशाची मागणी केली. तडजोडीअंती दीड लाख रुपयाची लाच देण्याचे ठरले.

तक्रारदार यांच्या भाच्याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, त्यात ४ मार्च २०१० रोजी सप्ताळे याने तक्रारदार यांच्या घरी जाऊन कोकरे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करण्यासाठी तीन दिवसात कागदपत्रासह हजर राहण्याची नोटीस बजावल्याचे सांगितले. तडजोड करुन प्रकरण मिटवतो असे सांगितले. त्यासाठी तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे स्वत:साठी दीड लाख रुपये तर खासगी इसम बापू शंकर कोकरे याला ७५ हजार रुपये असे एकूण २ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

चार साक्षीदार तपासले- सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तक्रारदार व पंच यांच्या साक्षी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी आरोपींना जास्तीच्या शिक्षेची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३,रा. गावडेवाडी,दक्षिण सोलापूर) याला चार वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तर खासगी इसम बापू शंकर कोकरे (वय ५३,रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर) यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. यात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. एम. अग्रवाल यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोकॉ चंद्र पल्ल यांनी मदत केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!