मुंबई : मुलुंड पूर्व परिसरातील एका दुकानातून मोबाईल चोरीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओ उलघडा झाला आहे. या व्हिडीओत चोरी करण्यासाठी दुकानात शिरलेल्या इराण देशाच्या व्यक्तीला व त्याच्या 2 मुलींना अटक करण्यात आली आहे. ही उत्तम कारवाई नवघर पोलिसांनी माहिम परिसरात केली. सोशल मीडियावर मोबाईल चोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आवाहन ठरले होते. मात्र मोबाईल चोरणाऱ्या अवघ्या 36 तासांत अटक करून सदर आवाहन धुडकावून लावले.
मुलुंड पूर्व परिसरात नील टेलिकॉम नावाचे मोबाईलचे दुकान आहे. 24 सप्टेंबर रोजी इराण देशाच्या 2 महिला व एक पुरुष इराणी चलन भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी व मोबाईल कव्हर घेण्याच्या बाहाण्याने दुकानात शिरले. दुकानातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बापलेकीने बोलण्यात गुंतवले तर दुसऱ्या मुलीने हातसफाईने 22 हजार 320 रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल लांबवून बॅगेत टाकला. मात्र ही मोबाईल चोरी दुकानातील सीसीव्टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रकाश लोहार (33) याने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोबाईल चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायर झाल्याने या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नवघर पोलिसांना दिले. नवघर पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत असताना खबऱ्याने माहिती दिली. मोबाईल चोरणारे इराण देशाचे नागरिक असून ते माहिम येथील एका इमारतीत राहत आहेत. त्यानुसार पोलिसांनी माहिम परिसरात सापळा रचून मोहम्मद जाफरी (53), लैला मोहम्मद जाफरी (33), झायरा मोहम्मद जाफरी (24) यांना अटक करून चोरलेला मोबाईल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या बापलेकींना 26 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोबाईल चोरी गुन्ह्याचा उलघडा परिमंडळ 7 चे उपायुक्त अखिलेशकुमार सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे, वपोनि पुष्कराज सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरणचे पोनि प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जाधव, पोउनि संतोष पिलाणो, पोउनि रूपाली पाटील, पोउनि प्रीती सावंजी, सपोउनि घाटगे, हवालदार ठाकूर, पोना खैरणार आदी पोलीस पथकाने केला.
मुलुंडमधील मोबाईल दुकानातल्या चोरीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओचा उलघडा ; मोबाईल चोरणाऱ्या इराण देशाच्या बापलेकींना माहिमध्ये अटक
