महाराष्ट्र

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात होम स्टे टुरिझमला चालना देणार – पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार

एमटीडीसीमार्फत जागतिक पर्यटन दिन साजरा

मुंबई, दि. २७ : पर्यटन विकासाबरोबर स्थानिकांना व्यवसाय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पर्यटन विभाग सध्या होम स्टेच्या संकल्पनेवर भर देत आहे.एअर बीएनबीसमवेत करार करुन सध्या एलिफंटा लेण्यांच्या परिसरात होम स्टेची संकल्पना राबविण्यात येत आहे. येत्या काळात रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही होम स्टे संकल्पनेस चालना दिली जाईल, अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आज जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. येरावार बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम,एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, ऑनलाईन हॉटेलिंग क्षेत्रातील स्टा (STAAH) चे व्यवस्थापकीय संचालक तरुण जौकानी, द बोहरी किचनचे मुनाफ कपाडीया, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन यांचा प्रचार करणे हे या वर्षीच्या पर्यटन दिनाचे उद्दिष्ट आहे. एमटीडीसीने यूएनडब्ल्यूटीओच्या (युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशन) या संकल्पनेसह आज जागतिक पर्यटन दिन साजरा केला.

राज्यमंत्री श्री. येरावार पुढे म्हणाले की, ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ या संकल्पनेसह जागतिक पर्यटन दिन साजरा करताना आनंद होत आहे. जगभरात होणारे डिजिटल परिवर्तन स्वीकारणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध प्रकारच्या लोकसंख्येशी आणि भूभागांतील पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यापुढे डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करु, असे ते म्हणाले.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम म्हणाले की,पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्वस्त आणि फायदेशीर आहे. या माध्यमातून विविध भागधारकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाता येते आणि या माध्यमांची दृश्यमानताही अधिक आहे. टेक-सॅव्ही पर्यटकांसाठी इंटरॅक्टिव्ह वेबसाइट आणि सोशल मीडिया विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून एका क्लिकवर त्यांना आवश्यक माहिती उपलब्ध होईल,असे त्यांनी सांगितले.

२०१३ मध्ये हॉटेलांचे ऑनलाईन बुकींग हे फक्त ६ टक्के इतके होत होते. तेच प्रमाण आता २०१८ मध्ये ६५ टक्क्यांवर आले आहे. पर्यटनाच्या वृद्धीसाठी भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान फारच क्रांतिकारी ठरेल, असे यावेळी स्टा (STAAH) चे व्यवस्थापकीय संचालक तरुण जौकानी यांनी सांगितले.  द बोहरी किचनचे मुनाफ कपाडीया यांनी होम डायनिंग अनुभवाची माहिती दिली.बोहरी किचनला जगभरातील पर्यटकांचा आकर्षणबिंदू बनविण्यात त्यांना आलेल्या यशाची त्यांनी माहिती दिली. याच पद्धतीने महाराष्ट्रातील कोळी समाजातील खाद्यसंस्कृती, पाठारे प्रभू समाजातील खाद्यसंस्कृती इत्यादी खाद्यसंस्कृतींविषयीही लोकांना मोठे आकर्षण आहे. पर्यटन विकास आणि स्थानिकांना रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!