ठाणे

वांगणी-काराव रस्त्यावरील पूल धोकादायक अवस्थेत ; पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची ‘धर्मराज्य पक्षा’ची मागणी

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वांगणी-काराव रस्त्यावरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून, त्याची त्वरित दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला जीवघेणा खेळ थांबवावा अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आली आहे. या मार्गावर असणाऱ्या डोणे, चरगाव या गावांत जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वांगणी-डोणे-चरगाव-काराव या गावांना जोडणाऱ्या नदीवरील हा पूल जीर्णावस्थेत असून, तो कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहे. असे असतानाही, पुलाची डागडुजी करण्याऐवजी प्रशासनाने मात्र सावधानतेचा इशारा म्हणून या पुलाजवळ सदर पूल नादुरुस्त आणि धोकादायक असल्याने, अवजड वाहनांसाठी प्रवेश करण्यास मनाई असल्याचा सूचनाफलक लावण्याशिवाय दुसरे कोणतेही कर्तव्य पार पाडलेले नसल्याने, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान,या प्रकरणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे जिल्हापरिषद बांधकाम विभाग आणि जिल्हापरिषद उपविभाग अंबरनाथ तसेच, स्थानिक आमदार किसन कथोरे यांना पत्र पाठवून संबंधित धोकादायक पुलाची त्वरित दुरुस्ती करून तो सुरक्षित व सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे. सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या या पुलाची आतापर्यंत एकदाही डागडुजी केलेली नसल्यामुळे, तो अत्यंत धोकादायक बनला असून, प्रशासनाला एखादी दुर्घटना घडल्याशिवाय जाग येणार नाही का? असा प्रश्न ‘धर्मराज्य पक्षा’चे स्थानिक कार्यकर्ते संजय दळवी यांनी या पत्राद्वारे उपस्थित केला आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन राज्यभरात भलेमोठे महामार्ग उभारण्याच्या वल्गना करीत असताना, सर्वप्रथम स्थानिक नागरिक व वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरलेला वांगणी-काराव रस्त्यावरील पूल दुरुस्त करा आणि मगच महामार्गांच्या गप्पा मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया दळवी यांनी आपल्या पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!