ठाणे : ठाणे पोलीस दलातील खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज करावाई केली. शासनाने बंदी घातलेल्या ट्रॅमोडॉल औषधाचा साठा बाळगल्या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत ट्रॅमोडॉलच्या 9 हजार 800 स्ट्रीप्स जप्त करण्यात आली असून या औषधाची किंमत 12 लाख 79 हजार 500 रुपये आहे. या आरोपींना न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आणखी औषधाचा साठा जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत.
शासनाने राजपत्र नोटिफिकेशन नं. एस.ओ. 1761(ई) व एस. ओ. 1762 (ई) नुसार ट्रॅमोडॉल या औषधावर 26 एप्रिल 2018 रोजी बंधी घातली आहे. असे असताना या औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे 24 सप्टेंबर रोजी ठाण्यातील ब्राह्मांड येथे सापळा लावून पोलीस पथकाने मयूर मेहता (46) याच्या मुसक्या आवळून ट्रॅमोडॉलच्या (100 एमजी) 9 हजार 800 स्ट्रीप्स जप्त केल्या. मेहताची चौकशी केली असताना या औषधाच्या गैरव्यापाऱ्यात सहभागी असलेल्या आणखी तिघांनी संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रोमेल लॉरेन्स वाज, संतोष पांडे, दीपक कोठारी यांना ताब्यात घेतले.
बेकायदा औषध बाळगल्या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 26/18) गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8, 21(क), 22(क) नुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. जप्त करण्यात आलेले ट्रॅमोडॉल हे औषधे आरोपी भारतात व परदेशात बेकायदेशीररीत्या विकणार होते. या गुन्ह्याचा पुढील तपास खंडणीविरोधी पथकाचे पोनि विकास घोडके करत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मधुकर पवार, उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध – 2, गुन्हे ) एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वपोनि प्रदीप शर्मा, पोनि राजकुमार कोथमिरे, पोनि संजय शिंदे, पोनि विकास घोडके, पोउनि महाजन, पोउनि बाबर, पोउनि गावंड, पोउनि देवरे, पोउनि कुटे, हवालदार गोसावी, हवालदार कटकधोंड, पोना भुर्के, पोना अोवळेकर, पोना भांगरे, पोना महाले, पोना कांबळे, पोना मुकणे, पोशि रोशन जाधव, पोशि उमेश जाधव आदी पोलीस पथकाने केली.
शासनाने बंदी घातलेले ट्रॅमोडॉल औषधाचा साठा जप्त चौघांना ठोकल्या बेड्या 12.79 लाखांच्या 9800 स्ट्रीप्स जप्त
