मुंबई : 26 वर्षीय गतिमंद मुलीची सुखरूप घरवापसी करण्यात आली आहे. ही उत्तम कामगिरी मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे यांनी केली. मुलगी सुखरूप मिळाल्याने तिच्या वडिलांनी सपोनि अश्विनी ननावरे यांच्यासह अंधेरी पोलिसांचे आभार मानले.
22 सप्टेंबर 2018 रोजी अंधेरीतील सहार मार्गावर एक मुलगी रस्त्यात बसून रडत असल्याची माहिती 100 नंबर सुजान नागरिकांनी दिली. त्यानुसार बिनतारी संदेश जारी होताच अंधेरी पोलीस ठाण्याची मोबाईल व्हॅन क्रमांक 5 त्या ठिकाणी पोहोचली. त्या मुलीला ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणले. कर्तव्यावर असलेल्या सपोनि ननावरे यांनी त्या मुलीशी संवाद साधला असता तिचे लहान मुलांसमान वागण्यावरून ती गतिमंद असल्याचे स्पष्ट झाले. तिला नाव, गाव विचारले असता ती फक्त “मन्नपूर” हाच शब्द बोलायची.
23 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाचा बंदोबस्त असल्याने पोलिसांनी तिला चेंबूर येथील महिला सुधारगृहात ठेवले.
दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी मुलीला पन्हा ताब्यात घेऊन मन्नपूरचा पाठपुरावा केला असता बिहार राज्यातील गावाचे नाव असल्याचे समजले. मात्र तिच्या बोलण्यावरून ती बिहार राज्याची नव्हती, हे पोलिसांना कळाले. तिचे बोलणे काहीचे बिजनोरच्या नागरिकांप्रमाणे असल्याने सपोनि ननावरे यांनी बिजनोरच्या परिचयाच्या एका नागरिकाशी संपर्क साधला. त्या नागरिकाने मुलीशी संवाद साधला असता ती मूळची बिजनोरची असल्याचे स्पष्ट झाले.
सपोनि ननावरे यांनी बिजनोर पोलिसांशी संपर्क साधला असता ती मुलगी “मदनपूर” या गावाची असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सदर मुलगी व तिचे कुटुंबीय काही महिन्यांपूर्वीच सुरत येथे स्थायिक झाल्याचे त्या गावातील नागरिकांकडून समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरतच्या दिशेने वळवला असता तेथील स्थानिक आंब्रोली पोलीस ठाण्यात ही मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले.
त्या मुलीचे वडिल व इतर नातेवाईक अंधेरी पोलीस ठाण्यात आल्यानंतर रेहाना सलमाने (26) हिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
रेहाना हिची घरवापसी करणाऱ्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या सपोनि अश्विनी ननावरे व पोलीस पथकाला सलाम..
सपोनि अश्विनी ननावरे यांची उत्तम कामगिरी ; गतिमंद 26 वर्षीय मुलीची घरवापसी
