ठाणे दि 30: युरोपमध्ये रस्त्यारस्त्यांवर वस्तू संग्रहालये आहेत, पर्यटक या वस्तुसंग्र्हालयांपासून आपल्या भेटीची सुरुवात करतात आपल्याकडे मात्र दुर्दैवाने वस्तूसंग्रहालय सर्वात शेवटी पाहिले जाते ते सुद्धा मुंबई पुणे, दिल्ली , कोलकात्यासारख्या मोठ्या शहरांत आहेत. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे ,ठाणे हे एक ऐतिहासिक शहर असून माझ्या जिल्हाधीकारीपदाच्या कारकिर्दीत या शहरात एक उत्तम वस्तुसंग्रहालय उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेत काल जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की,पूर्वी ठाण्यात सातत्याने व्याख्याने व्हायची आणि चांगल्या चांगल्या वक्त्यांना ऐकण्याची संधी आपणास मिळाली आहे. आज इतिहास कालबाह्य झाला आहे असा समज झाला असला तरी ते सत्य नाही. एकदा अवकाशात झेप घ्यायचे ठरवले की त्या आकाशाची उंची किती आहे याचा विचार करु नका ते गाठायचे ठरले तर निश्चित गाठा असे सांगत त्यांनी आपले महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन केले. इतिहास आणि मराठी हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे होते. जेव्हा या विषयांकडे वळलो तेव्हा तो ध्यास निर्माण झाला. १२ – १४ तास या विषयांचा अभ्यास करु लागलो. त्यानंतर इतिहासात एमए करायचे ठरविले. याच विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची फेलोशिप देखील मिळाली. डॉक्टर, इंजिनिअर हीच क्षेत्र करिअर नाहीत. जर आवड असेल तर सामाजिक शास्त्रातील विषयाला तेवढीच गती मिळते. दुर्दैवाने पीएचडी करण्याची माझी इच्छा अपुर्ण राहीली परंतू ठाण्यात आल्यावर ही इच्छा पुर्ण करायला हरकत नाही असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अनंत देशमुख यांनी १८१८ ते १८५ या ३९ वर्षांत मुंबईवर १५ गव्हर्नर यांनी कसा कारभार केला आणि त्यांच्या प्रत्येकाच्या काळात येथील जीवनावर प्रभाव टाकणारे मुलभूत बदल होत गेले याचे खुमासदार शैलीत विवेचन केले. ते म्हणाले कि, रस्ते, शिक्षण आरोग्य व्यवस्था, पाणी , पोस्ट अशा अनेक सुविधा निर्माण झाल्या. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे माहित असूनही हिंदू, टाईम्स सारखी वृत्तपत्रे सुरु झाली. कालांतराने इंग्रजांचा अंतस्थ हेतू कळल्यावर जनता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात उभी राहिली आणि लढा सुरु झाला असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, ठाण्याला अडीच हजार वर्षांचा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे, तो वाया जाऊ नये म्हणून याठिकाणी एक चांगले वस्तुसंग्रहालय असणे गरजेचे आहे. प्रा. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर, विलास ठुसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आदीत्य दवणे यांनी केले.