वसई : वसई रेल्वे स्थानकातून सोने व्यापाऱ्याचे 44 लाख 87 हजार 378 रुपयांचे दागिने पळवणाऱ्या टोळीला अवघ्या 72 तासांत तुरुंगात टाकण्यात आले. कमाली बाब म्हणजे सोने व्यापाऱ्याला लुटण्याचा डाव व्यापाऱ्याच्या मित्रानेच रचला होता. पोलिसांनी चोरीला गेलेले दागिने झवेरी बाझारातील एका दुकानातून जप्त केले आहेत. या लुटीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी 3 जणांचा वसई लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोन्याचे व्यापारी असलेले कुंदन पुखराज वैष्णव (38) हे सोन्याचे दागिने बनवतात. हैदराबाद येथे एका व्यापाऱ्याने कुंदन यांना 1465.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने बनवण्याची ऑडर दिली होती. सदर दागिने 29 सप्टेंबर 2018 रोजी कुंदन हैदराबादच्या सोनाराला देण्यास जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकात आले. सायंकाळी 5:45 वाजता वसई स्थानकातील फलाट क्रमांक 6 वर आलेल्या भावनगर काकीनाडा एक्सप्रेसमध्ये कुंदन चढले. आसनाजवळ बसण्यासाठी जात असताना 3 इसमांनी कुंदन यांच्या खांद्याला अडकलेली बॅग खेचून पळ काढला. या दागिने चोरीला गेल्या प्रकरणी कुंदन यांच्या फिर्यादीवरून वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 2087/18) भादंवि कलम 395, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तात्काळ वसई लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी कुंदन यांच्या राहत्या घरापासून वसई रेल्वे स्थानकापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता दुचाकीस्वार 3 इसम घरापासूनच कुंदन यांचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. तेच इसम स्थानकातही कुंदन यांच्या आजूबाजूला दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्या तिघांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान खबऱ्याने पोलिसांना त्या तिघांपैकी एकाची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तौसिफ तोकिर खान (23) याला विरार येथील राहत्या घरातून पोलिसांनी उचलले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने कुंदन यांना हरेश रावल (35) या सोने व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून लुटण्याचा डाव रचल्याची माहिती दिली. तसेच या चोरीच्या कटात सहभागी असलेल्या साथीदारांची नावे सांगितले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी हुसेन इलियास सुबवाना (32), रफिक युसूफ शेख (32) व हररेश रावल याच्या मुसक्या आवळल्या.
चोरट्यांनी कुंदनचे लुटलेले दागिने त्याच दिवशी हरेश याला दिले होते. पोलिसांनी हरेशची चौकशी केली असता झवेरी बाजारातील दुकानात दिगने लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगताच लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ 44 लाख 87 हजार 378 रुपयांचे 1465.5 ग्रॅम वजनांचे विविध दागिने पोलिसांनी जप्त केले. या आरोपींना 6 ऑक्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा उलघडा लोहमार्ग पूर्व / पश्चिम परिमंडळचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, वपोनि विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दर्शन पाटील, हवालदार, साबीर पठाण, संजय निकम, प्रकाश साळुंखे, चंद्रकांत जाधव, पोना इजाज शेख, सचिन मोरे, सचिन घाग, अफरोज खान, सुदर्शन देशमुख, विकास शेलार, दत्तात्रय गोपाळे, शैलेश पवार, पोशि निलेश देवरुखकर, पांडुरंग पुरी, नागसेन चौधरी, प्रतीक मेहेर, सर्फराज शेख, लक्ष्मण हटकर, अशोक नरवडे, गणेश सानप आदी पोलीस पथकाने 72 तासांत केला.